नवी दिल्ली : दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर कॉकरोच जनता पार्टीकडून नीट पेपरफुटीविरोधात तीव्र आंदोलन सुरू आहे. पर्यावरणशास्त्रज्ञ सोनम वांगचुक हे गेल्या २० दिवसांपासून या आंदोलनासाठी उपोषणाला बसले होते. मात्र, आज दिल्ली पोलिसांनी कोर्ट आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचा दाखला देत वांगचुक यांना बळजबरीने रुग्णालयात दाखल केले. दिल्ली पोलिसांच्या या कारवाईमुळे जंतर-मंतर येथील उपोषणस्थळी प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली असून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.
दरम्यान, सोनम वांगचूक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर आंदोलन थांबणार नसल्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला असून, येत्या काही दिवसांत या मुद्द्यावर राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यावर आपली प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की, पाच-सहा दिवसांत अटक करतील, नेमकं तसं झालं आहे. त्यांची मागणी काय होती, तर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा. का तर त्यांच्याकडे शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी होती. परंतु धर्मेंद्र प्रधान यांनी ती जबाबदारी काळजीपूर्वक हाताळली नाही. त्याचे परिणाम हजारो विद्यार्थ्यांवर झाले. आंदोलनातून मागणी होत आहे, तरी केंद्र सरकार बघ्याची भूमिका घेत आहे.
तरीदेखील हे आंदोलन चालूच राहणार
शेवटी त्यांच्या मागणीसाठी इतर राजकीय पक्षदेखील उभे राहिले. काँग्रेसच्या वतीने तिचे प्रतिनिधी गेले, राष्ट्रवादीच्या वतीने सुप्रिया सुळे गेल्या, इतर पक्षांचे लोक गेले आणि सामूहिक मागणी त्या ठिकाणी करण्यात आली. हे आपल्या आवाक्याबाहेर आहे, हे ज्या वेळेस लक्षात आले, त्यावेळेस हा अटक करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे आज पहाटे त्यांना अटक झाली. त्यांनी अटक जरी केली, तरीदेखील हे आंदोलन चालूच राहणार,ङ्घङ्घ असे त्यांनी म्हटले. शरद पवार पुढे म्हणाले की, त्यांची मागणी रास्त आहे. विद्यार्थ्यांसाठी होती. वीस दिवस दिल्लीमध्ये असून तुम्ही साधे भेटायलासुद्धा येत नाहीत. हे आंदोलन सुरूच राहील. या विषयानेच संसदेला सुरुवात होईल,ङ्घङ्घ असा इशारा त्यांनी यावेळी केंद्र सरकारला दिला आहे .