फुलंब्री (प्रतिनिधी ) नारीशक्ती वंदन विधेयकाच्या माध्यमातून संसद आणि राज्य विधानसभामध्ये महिलांना ३३% आरक्षण मिळणार असून या विधेयकाला समर्थन म्हणून फुलंब्री तालुक्यातील गणोरी येथे भव्य पदयात्रा काढण्यात आली. मुख्य बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पदयात्रेस सुरुवात झाली. "सशक्त नारी, सशक्त भारत" "नारीशक्ती वंदन, मोदीजींचे अभिनंदन" या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
या महिला रॅलीमध्ये संत रामलाल बाबा गेंदाई महिला भजनी मंडळ, राजमुद्रा बहुउद्देशीय सामाजिक संस्था, प्रेरणा महिला समूह, रमाई महिला समूह, संत सावता महिला समूह, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महिला समूह, जिल्हा परिषद शाळा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गणोरी, राधिका महिला समूह, नवसंजीवनी महिला समूह, तुळजाभवानी महिला समूह ,जय भीम महिला समूह, गुरुकृपा महिला समूह, तेजस्विनी महिला समूह, विठोबा महिला समूह, रेणुका माता महिला समूह, प्रगती महिला समूह, चैतन्य महिला समूह, ज्ञानेश्वरी महिला समूह, अष्टविनायक महिला समूह त्याचबरोबर आरोग्य सेविका, अंगणवाडी शिक्षिका, अंगणवाडी सेविका, अशा सेविका, विविध राजकीय, सामाजिक पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी आणलेले नारीशक्ती वंदन हे विधेयक महिलांना लोकसभा व विधानसभेत ३३ टक्के आरक्षण मिळवून देणारे आहे. यामुळे महिलांचा सहभाग वाढणार असून यामुळे एकप्रकारे महिलांचा खरा सन्मान होणार असल्याचे मत जिल्हाध्यक्ष ऐश्वर्या गाडेकर यांनी व्यक्त केले. या रॅलीत शेकडो महिलांची उपस्थिती दिसून आली असून प्रामुख्याने राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या महिला शेवटी चालताना दिसल्या.












