पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या दोन्ही पक्षांच्या आघाडीसाठी शरद पवार गटाचे नेते माजी महापौर अंकुश काकडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामती होस्टेलवर शुक्रवारी रात्री भेट घेतली. त्यावेळी जागावाटप आणि घड्याळ की तुतारी चिन्हावर लढायचे, याविषयी चर्चा झाली. शरद पवार गट तुतारी चिन्हासाठी ठाम होता. केवळ ३५ जागा देण्याचा प्रस्तावही शरद पवार गटाला अमान्य होता. त्यामुळे चर्चा फिस्कटली.
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाशी चर्चा फिस्कटल्यानंतर शरद पवार गटाने तातडीने महाविकास आघाडीच्या घटक पक्षांशी चर्चा सुरू केली आहे. काँग्रेस, उद्धवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या तिन्ही पक्षांची उशिरा रात्री संयुक्त बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) चे विशाल तांबे, अंकुश काकडे, मनाली भिलारे, अश्विनी कदम आणि आमदार बापू पठारे, तर काँग्रेसकडून अरविंद शिंदे, अभय छाजेड, रमेश बागवे आणि उद्धवसेनेचे वसंत मोरे, गजानन थरकुडे, संजय मोरे हे उपस्थित होते.
दरम्यान याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांच्यात आज सकाळी अजितदादांच्या जिजाई निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील आगामी निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांच्या संभाव्य आघाडीवर सविस्तर चर्चा झाली. पुण्यातील आघाडीची शक्यता सध्या कमी दिसत असली तरी, पिंपरी-चिंचवडमध्ये युती करण्यावर दोन्ही पक्षांचे नेते सकारात्मक असल्याचे दिसून आले. या बैठकीत जागावाटप आणि चिन्हाबाबत वरिष्ठ स्तरावर निर्णय घेण्यावरही एकमत झाले.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी पक्षांची आघाडी होण्याची शक्यता मावळली असली तरी, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी मात्र दोन्ही पक्षांचे नेते जोरदार तयारी करत आहेत. या संदर्भात दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या तीन बैठका यापूर्वीच पार पडल्या आहेत. आज सकाळी झालेल्या बैठकीत अजित पवार आणि अमोल कोल्हे यांनी सुमारे पाऊण तास चर्चा केली. या चर्चेत आघाडी झाल्यास कोणत्या जागांवर कोण लढणार, यावर विचारविनिमय झाला. तसेच पक्षाच्या चिन्हाबाबतचा अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेतील, असेही स्पष्ट करण्यात आले.
पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे इच्छुक उमेदवारही दोन्ही पक्षांची आघाडी व्हावी यासाठी प्रयत्नशील आहेत. अजित पवारांची भेट घेतल्यानंतर अमोल कोल्हे पिंपरी-चिंचवडमधील सर्व इच्छुक उमेदवारांची स्वतंत्र बैठक घेणार आहेत. या बैठकीत पिंपरी-चिंचवडमधील सर्व ३२ प्रभागांतील १२८ जागांसाठीच्या उमेदवारांशी चर्चा केली जाईल. या चर्चेतून एक सविस्तर प्रस्ताव तयार करून तो आजच वरिष्ठ नेत्यांकडे पाठवण्यात येणार आहे. या प्रस्तावावरच पिंपरी-चिंचवडमधील आघाडीचे भवितव्य ठरणार आहे.
अंकुश काकडे काय म्हणाले?
दरम्यान, अंकुश काकडे यांनी स्पष्ट केले आहे की, अजित पवारांसोबत पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात कोणतीही बैठक झाली नाही. काल आम्ही चौघे त्यांना भेटलो होतो. महानगरपालिका एकत्रित लढवण्याचा प्रस्ताव अजित पवारांनी दिला होता. मात्र, आमच्या पक्षाने आधीच महाविकास आघाडीसोबतच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय त्यांना कळवण्यासाठी आम्ही गेलो होतो. याव्यतिरिक्त कोणतीही चर्चा कालच्या बैठकीत झाली नाही.
अजित पवारांनी आघाडी करण्याची विनंती केली होती. पण आम्ही त्यांना कळवले की आम्ही तुमच्यासोबत पुणे महानगरपालिका लढवणार नाही. आमची महाविकास आघाडीसोबत सकारात्मक चर्चा सुरू आहे आणि आज रात्रीपर्यंत सर्व अंतिम होईल, असं काकडे म्हणाले.