सोलापूर : ज्ञानेश कुमार यांच्या संदर्भात केंद्र सरकारने तातडीने निर्णय घ्यायची आवश्यकता आहे, असे सांगत, यंदा आमच्याकडे दिवाळी नाही, आम्ही दिवाळी साजरी करणार नाही. सध्या शेतकरी आणि जनता भीषण पाणी व चाऱ्याच्या समस्येला तोंड देत आहे. माझे संपूर्ण लक्ष दुष्काळ निवारणावरच केंद्रित आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
नुकसानग्रस्तांना पाच हजार रुपयांची मदत देण्याबाबत मुख्यमंत्री आणि दिल्ली दरबारी चर्चा झाली असून त्यावर लवकरच तोडगा निघेल. प्रकल्प आला म्हणजे पाणी संपले असे होत नाही, तरीही पाण्याचा वापर जपूनच व्हावा लागेल. या प्रकल्पाची संपूर्ण माहिती घेऊन आवश्यक त्या सुधारणा सुचवल्या जातील, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी उजनी येथील प्रस्तावित एआय प्रकल्पाबाबत बोलताना दिली.
ज्ञानेश कुमार यांच्याबद्दल केंद्र सरकारने तातडीने निर्णय घ्यावा
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. ज्ञानेश कुमार यांच्या संदर्भात केंद्र सरकारने तातडीने निर्णय घ्यायची आवश्यकता आहे. निर्णय घेतला नाही, त्यामुळे दिल्लीत विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. सुप्रिया सुळे आणि संजय राऊत आंदोलनातून लढणार आहेत. माझे लक्ष पाणी-चारा आणि दुष्काळावर आहे. मी याकडे कोणत्याही राजकीय दृष्टिकोनातून पाहत नाही. ही राजकारण करण्याची वेळ नसून सर्वांनी मिळून या संकटावर मात करण्याची गरज आहे. प्रत्येकाने मदतीचा हात पुढे केला पाहिजे, असे शरद पवार यांनी सांगितले.
दरम्यान, स्थानिक आमदारांसमवेत प्रत्यक्ष गावोगावी जाऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेणार आहे. जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. राज्य सरकारकडे तातडीच्या मदतीची विनंती केली जाईल. ती मदत मिळेल, अशी खात्री आहे. खडकवासलासह प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्याचा वापर थेट जून महिन्यापर्यंत अत्यंत काळजीपूर्वक आणि नियोजनबद्ध पद्धतीने करावा लागेल, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.