पाण्याच्या डोहात पडून चिमुकल्याचा अंत

Foto
गंगापूर, (प्रतिनिधी) : गंगापूर तालुक्यातील पेंडापूर - खैरगव्हाण शिवारात घराच्या पाठीमागे असलेल्या पाण्याच्या डोहात पडून चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता. १२) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. विराज रोहिदास लोणकर (वय ५) असे या मृत बालकाचे नाव आहे. विराज हा पेंडापूर येथील रहिवासी असून तो सिनियर केजीमध्ये शिकत होता.

गुरुवारी सायंकाळी तो घराजवळ खेळत असताना अचानक पाठीमागे असलेल्या पाण्याच्या डोहाकडे गेला. खेळण्याच्या नादात त्याचा पाय घसरून तो पाण्यात पडला. बराच वेळ होऊनही विराज घरात किंवा परिसरात कुठेच दिसत नसल्याने आई-वडील आणि कुटुंबातील सदस्यांनी त्याची शोधाशोध सुरू केली.

शोध घेताना कुटुंबीयांचे लक्ष घरामागच्या पाण्याच्या डोहाकडे गेले. तिथे विराज बेशुद्ध अवस्थेत मिळून आला. त्याला तातडीने बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय, गंगापूर येथे दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. विराजच्या पश्चात आई-वडील, एक मोठी बहीण, काका-काकू असा मोठा परिवार आहे.