आजपासून मुंबईसह राज्यात पावसाचा जोर ओसरणार, हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज...

Foto
मुंबई : संपूर्ण राज्यात गेल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली. मुंबईसह राज्यातील इतर भागात पावसाचा जोर होता. दरम्यान, आजपासून मुंबईसह राज्यात पावसाचा जोर ओसरणार आहे. त्यामुळे यापुढे फारसा पाऊस पडणार नाही. अधूनमधून हलक्या सरी बरसतील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबईत काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने गेल्या आठवड्यात दमदार हजेरी लावली. राज्यातही सर्वदूर पाऊस सक्रिय झाला होता. त्यानंतर सोमवारपासून पावसाने पुन्हा विश्रांती घेतली आहे.

दरम्यान, कमी दाब प्रणाली गुजरातकडे सरकल्यामुळे आजपासून संपूर्ण राज्यात पावसाचा जोर ओसरणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले. त्यामुळे यापुढे पावसाचा जोर नसेल. पावसाने उघडीप दिल्याने तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या तापमानाचा पारा ३० ते ३२ अंश सेल्सिअस पर्यंत आहे. यात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे. यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.

खंभातचा आखात आणि परिसरावर ठळक कमी दाब क्षेत्र सक्रिय आहे. त्याला लागून समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. अरबी समुद्राकडे सरकत असलेली ही प्रणाली बुधवारी तीव्र होण्याची शक्यता आहे. या प्रणालीपासून पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

उत्तर अंदमान समुद्रातील चक्राकार वाऱ्यामुळे बंगालच्या उपसागरात बुधवारी नव्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. याचा परिणाम, तसेच मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सुरू झाल्याने राज्यात पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी शुक्रवारी संपूर्ण राजस्थान, जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमधून माघार घेतली आहे. तसेच गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशच्या काही भागातून मोसमी वाऱ्यांच्या परतीचा प्रवास सुरू झाला. वेरावल, भरूच, उज्जैन, झांसी, शहाजहानपूरपर्यंतची मोसमी वाऱ्यांची सीमा सोमवारी कायम होती. गेल्या तीन-चार दिवसांपासून मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास जैसे थे आहे.