पुणे : मागील काही दिवसांपासून शेतकरी मान्सूनची वाट पाहत आहेत. दरम्यान, आता हवामान विभागाने मोठी अपडेट दिली आहे. केरळमध्ये २६ मे पर्यंत मान्सून दाखल होण्याचा अंदाज वर्तवला आहे. आता केरळमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, राजधानी दिल्लीत आणखी तीन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे. तर महाराष्ट्रात मान्सून १० जूनपासून बरसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत नैऋत्य मोसमी वार्यांच्या नैऋत्य आणि आग्नेय अरबी समुद्राच्या उर्वरित भागांमध्ये, कोमोरिन क्षेत्रात, आग्नेय आणि पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात आणि अंदमान समुद्रात प्रवेश करण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. केरळमध्ये मोसमी वार्यांच्या आगमनाची सामान्य तारीख १ जून आहे.
केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर मान्सून वर सरकतो. तो कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र अशा राज्यांत प्रवेश करतो. यावर्षी १० जूनपर्यंत महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. १० जून रोजी महाराष्ट्रात आल्यानंतर येत्या १५ जून रोजी मान्सून मध्य प्रदेश, गुजरातमध्ये पोहोचणार आहे. त्यानंतर राजस्थानमध्ये २५ जून ते ५ जुलैपर्यंत मान्सून पोहोचू शकतो.
केरळमध्ये यलो अलर्ट
२५ मे रोजी, पथानामथिट्टा, अलाप्पुझा, कोट्टायम, इडुक्की, एर्नाकुलम, त्रिशूर, मलप्पुरम, कोझिकोड आणि वायनाडसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसर्या दिवशी, २६ मे रोजी, तिरुवनंतपुरम, कोल्लम, अलाप्पुझा आणि एर्नाकुलमसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. २७ मे रोजी तिरुवनंतपुरम, कोल्लम आणि अलाप्पुझा या तीन जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे.
२८ मे रोजी या यादीत तिरुवनंतपुरम, कोल्लम, पथानामथिट्टा, अलाप्पुझा, कोट्टायम, एर्नाकुलम आणि इडुक्की यांचा समावेश करण्यात आला.
हवामान विभागाने राज्यात २६ मे रोजी मान्सूनचे आगमन होण्याचा अंदाज वर्तवला आहे. तसेच, विभागाने २८ मे ते ३ जून दरम्यान केरळच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाजही वर्तवला आहे.
देशातील सर्वात उष्ण ठिकाण
रविवारी अनेक राज्यांमध्ये तीव्र उष्णतेची लाट होती, महाराष्ट्रातील विदर्भ भागातील ब्रह्मपुरी येथे ४७.२ अंश सेल्सिअस या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. हवामान विभागाने २९ मे पासून उष्णतेपासून हळूहळू दिलासा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ङ्गङ्घपुढील सात दिवस मध्य आणि वायव्य भारतावर आणि पुढील ३-५ दिवस पूर्व आणि लगतच्या द्वीपकल्पीय भारतावर उष्णतेची लाट ते तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.