आई-वडिलांना विषारी इंजेक्शन देऊन संपवणाऱ्या नर्सने स्वतः ही इंजेक्शनने संपवले स्वतःचे आयुष्य !!

Foto
हैद्राबाद :  तेलंगणामधून एक अत्यंत हादरवून टाकणारी आणि थरारक घटना समोर आली आहे. प्रेमात आंधळी होऊन आपल्याच आई-वडिलांची विषारी इंजेक्शन देऊन हत्या करणाऱ्या एका नर्सने अखेर स्वतःही तेच टोकाचे पाऊल उचलले आहे. आई-वडिलांच्या हत्येप्रकरणी कारागृहात शिक्षा भोगून नुकतीच जामिनावर बाहेर आलेली ही नर्स सुरेखा हिने संगारेड्डी येथील एका खाजगी हॉस्टेलमध्ये स्वतःला विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
तेलंगणातील विकाराबाद जिल्ह्यातील बंटवारम मंडलच्या याचारम गावची रहिवासी असलेली सुरेखा ही नर्स म्हणून काम करत होती. काही महिन्यांपूर्वी ती एका तरुणाच्या प्रेमात पडली आणि त्याच्याशी लग्न करण्यावर ठाम होती. मात्र, तिच्या या प्रेमप्रकरणाला आणि लग्नाला आई-वडिलांचा कडाडून विरोध होता. या वादातूनच सुरेखाने आपल्याच जन्मदात्या आई-वडिलांना संपवण्याचा कट रचला.

यावर्षीच्या सुरुवातीला म्हणजेच २४ जानेवारी २०२६ रोजी सुरेखाच्या घरातील तिचे वडील दशरथ आणि आई लक्ष्मी मृत अवस्थेत आढळले होते. सुरुवातीला हा प्रकार नैसर्गिक मृत्यू असल्याचे वाटत होते. मात्र, पोलिसांना घटनास्थळावरून काही सिरिंज आणि इंजेक्शनच्या खाली बाटल्या मिळाल्या, ज्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. कसून चौकशी केली असता, सुरेखानेच आपल्या प्रियकराच्या प्रेमात वेडी होऊन आई-वडिलांना विषारी इंजेक्शन देऊन त्यांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. याप्रकरणी पोलिसांनी सुरेखाला जानेवारी महिन्यातच अटक केली होती.

जामिनावर बाहेर आल्यावर उचलले टोकाचे पाऊल
आई-वडिलांच्या हत्येच्या गुन्ह्यात काही कालावधी तुरुंगात काढल्यानंतर सुरेखा नुकतीच जामिनावर बाहेर आली होती. जामिनावर सुटल्यानंतर ती संगारेड्डी जिल्हा मुख्यालयातील एका खाजगी हॉस्टेलमध्ये राहत होती.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ज्या विषारी इंजेक्शनचा वापर करून तिने आपल्या आई-वडिलांची हत्या केली होती, त्याच विषारी इंजेक्शनचा वापर करून तिने स्वतःचेही जीवन संपवले आहे. घटनेची माहिती मिळताच संगारेड्डी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमार्टमसाठी पाठवून दिला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. सुरेखाची मानसोपचार तज्ज्ञांच्या मते मानसिक स्थिती कशी होती आणि तिने नेमक्या कोणत्या नैराश्यातून हे टोकाचे पाऊल उचलले, याचा पोलीस तपास करत आहेत.