१०० टक्के भरण्यासाठी हवे पाच फूट पाणी
रमेश लिंबोरे
पैठण, मराठवाड्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी होते त्यामुळे यावर्षी धरण भरते की नाही अशी भीती व्यक्त करण्यात येत असताना मात्र नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्याने नाथ सागर जलाशयाला तारले असून अवघ्या पाच दिवसात ४४ टक्के नाथ सागर जलाशयात दाखल झाले आहे. पाणी नाशिक व अहिल्या नगर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीच्या प्रवाहात झपाट्याने वाढ झाली.
या प्रवाहाचे पाणी नाथसागर जलाशयात दाखल झाल्याने जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात लाक्षणिक वाढ होण्यास सुरुवात झाली असून शुक्रवारी सकाळी नऊ वाजता जलाशयात ७४.३१ टक्के उपयुक्त पाणीसाठा नोंदविण्यात आला असून आवक २४,२३४ क्यूसेक सुरू होती. तर डाव्या कालव्यातून शंभर क्यूसेक विसर्ग करण्यात आला आहे.
नाशिक परिसरातील गंगापूर, दारणा तसेच गोदावरी खोऱ्यातील धरणांमधून सुरू असलेल्या विसर्गामुळे
जायकवाडीकडे येणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मराठवाड्यासाठी जीवनदायी ठरणाऱ्या नाथसागर जलाशयातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून मराठवाड्याचा पिण्याचा पाण्याचा औद्योगिक वसाहतीचा तसेच सिंचनाचा प्रश्न मिटला आहे. बंद करण्यात आलेला औद्योगिक वसाहतीचा पाणीपुरवठा पुन्हा
सुरू करण्यात आला आहे. तसेच डाव्या कालव्यातून शंभर क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे.
शुक्रवारी दुपारी बारा वाजता नाथ सागर जलाशयाची पाणी पातळी पुढील प्रमाणे :
नाथसागर जलाशयाची आजची पाणी पातळी
१५२२ फुट क्षमता असलेल्या नाथ सागर जलाशयाची पाणी पातळी १५१६.९४ फुट, ४६२.३६३ मीटर, जिवंत पाणीसाठा. १६६ दशलक्ष घनमीटर, एकूण पाणीसाठा २३५१.२७२ दशलक्ष घनमीटर, ८२.७६ टीएमसी, आवक २४२३४ क्यूसेक प्रत्येक तीन तासाला सुरू आहे.













