जंतर-मंतरवर झालेले आंदोलन ही तर सुरुवात, राज ठाकरेंचे महत्त्वाचे विधान

Foto
नाशिक : नीट पेपरफुटीनंतर दिल्लीतील जंतर-मंतरवर ४० दिवस विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. या आंदोलनाबद्दल देशात सर्व पातळीवर चर्चा सुरू आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही या आंदोलनाबाबत मत व्यक्त केले. नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत असताना ते म्हणाले, बर्‍याच वर्षांनंतर असे आंदोलन होत आहे. प्रत्येक आई-वडिलांचा मुलगा नीट परीक्षेला बसला नव्हता. दिल्लीत आंदोलनाला आलेले तरुण-तरुणींचा सर्व सभोवतालचा राग बाहेर आला होता. मला वाटते, पुढच्या काळात तो आणखी जोरात बाहेर येईल. जंतर-मंतरवर झालेले आंदोलन ही सुरुवात आहे.

राज ठाकरे पुढे म्हणाले, ज्यावेळी दिल्लीतील आंदोलक तरुणांना मारले, तेव्हा हे आंदोलन घराघरात पोहोचले. प्रत्येत आई-वडिलांना किंवा वृद्धांना आपल्या मुलाला मारले, असे वाटले. खरंतर जंतर-मंतरवर शांतपणे आंदोलन सुरू होते. सरकारने याची सुरुवात केली. मला वाटते, भाजपामधील हे अंतर्गत भांडण आहे. त्याच गोष्टी आता चव्हाट्यावर येत आहेत.

दगडांवरील ठशे आणि त्यावरून आधार कार्ड तपासणार्‍या चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील विद्यार्थ्यांकडे अधिक लक्ष दिले पाहिजे, अशीही टीका राज ठाकरे यांनी केली. दहावी पास झाल्यानंतर पहिल्यांदा क्लासमध्ये प्रवेश घेतला जात आहे आणि क्लास ठरवतो की कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा. आज विद्यार्थी कॉलेजमध्ये न जाता, आठ-आठ तास क्लासमध्ये जाऊन बसत आहेत. मग कॉलेज काय करत आहे? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

राज ठाकरे पुढे म्हणाले, सर्वच कोचिंग क्लास वाईट नाहीत. पण आता याचा धंदा झाला आहे. नीटचा पेपर याच कोचिंग क्लासकडून फुटला. केंद्र सरकारने निलेकणी यांना आणले आहे, त्यांनी आधी या कोचिंग क्लासकडे लक्ष दिले पाहिजे. चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे. क्लासमध्ये आठ-आठ तास बसल्यानंतर कॉलेजमध्ये हजेरी कशी काय लागते?

नाशिकमधील आत्महत्याग्रस्त मुलाचे नाव यादीत का नाही?
नीटचा पेपर फुटल्यानंतर देशभरात २१ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. नाशिकच्या यश गोसावी या मुलानेही नैराश्यातून आत्महत्या केली. मात्र सरकारने या मुलाचे नाव आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्यांच्या यादीत घेतलेले नाही, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

शिक्षणमंत्र्यांचीच मुलगी विदेशात शिकते
आताच्या तरुण पिढीच्या हातात मोबाइल आहे. ते जगभरात काय चालले आहे हे पाहतात. त्यामुळे अनेकांना विदेशातील विद्यापीठात जाऊन शिक्षण घ्यावेसे वाटते. दरवर्षी हजारो भारतीय विद्यार्थी विदेशात शिक्षणासाठी जात आहेत. त्यांच्या शिक्षणासाठी पालक वर्षाला पाच लाख कोटी रुपये खर्च करतात. हा प्रचंड मोठा आकडा आहे. देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीनेही विदेशात शिक्षण घेतले आहे. जर शिक्षण मंत्र्यांच्या मुलीचा इथल्या शिक्षण व्यवस्थेवर विश्वास नसेल तर सामान्य पालकांचा का असेल?, असा प्रश्न उपस्थित करत राज ठाकरे यांनी शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.