अहमदाबाद : एका सामान्य कुटुंबातील व्यक्तीला, ज्या कुटुंबातील पिढ्यांनी कधी गावचा प्रमुख बनण्याचे स्वप्नही पाहिले नव्हते, त्या व्यक्तीवर विश्वास दाखवलात. तुम्ही माझ्यावर आधी गुजरातची आणि त्यानंतर संपूर्ण राष्ट्राची सेवा करण्याची जबाबदारी सोपवली. जनतेची सेवा करणे म्हणजेच राष्ट्राची सेवा करणे होय. गुजरातचा विकास हा देशाच्या विकासात योगदान देतो. राष्ट्रासाठी जे काही साध्य करू शकलो आहे, त्याचे श्रेय माझ्या सर्व देशवासियांना जाते. याबद्दल मी आयुष्यभर तुमचा ऋणी राहीन. माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी तुमची सेवा करण्यासाठी समर्पित राहीन, असा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. बनासकांठा येथे एका सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. अनिश्चिततेने भरलेल्या या जगात, भारताची जलद प्रगती जगासाठी एक नवी आशा घेऊन आली आहे. हे लक्षात घेता, आपल्याला 'एक भारत, श्रेष्ठ भारत' या मार्गावर पुढे जायचे आहे. ३१ ऑक्टोबर रोजी देश 'राष्ट्रीय एकता दिवस' साजरा करत आहे; हा दिवस या संकल्पाला अधिक बळ देण्याचा दिवस आहे. मी देशातील नागरिकांना, विशेषतः तरुणांना, देशभर आयोजित केल्या जाणाऱ्या 'रन फॉर युनिटी' (एकतेसाठी धाव) मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
असे लोक आहेत ज्यांना देशाला अडचणीत पाहायचे असते
प्रत्येक तरुण, महिला भारताला एक विकसित राष्ट्र बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे. परंतु, काही लोकांना हे आवडत नाही. हे असे लोक आहेत ज्यांना देशाला अडचणीत पाहायचे असते; देशाला संकटात पाहून त्यांना आनंद होतो. जेव्हा संपूर्ण राष्ट्र आखाती प्रदेशातील तणावामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेचा सामना करत आहे, तेव्हा हे लोक खते आणि गॅसच्या तुटवड्याबाबत अफवा पसरवत आहेत. त्यांना हे केवळ मोदींची बदनामी करण्यासाठी करायचे होते. शेतकरी बांधवांना आणि सर्वांना आठवण करून देऊ इच्छितो की, तुम्हाला वचन दिले होते की, तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन. आखाती प्रदेशातील तणाव अजूनही कायम आहे, परंतु सरकारने जगभरात खतांच्या किमती वाढल्या असतानाही, त्याचा बोजा आपल्या शेतकऱ्यांवर पडू दिला नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले.
दरम्यान, संपूर्ण भारत एकजुटीने त्याचे परिणाम भोगत असताना, काही लोक अफवा पसरवण्यात व्यस्त आहेत. देशात अराजकता निर्माण करणे आणि मोदींना बदनाम करणे हा त्यांचा हेतू होता, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर केली. ७ ऑक्टोबर रोजी, सार्वजनिक पदावरील माझ्या कार्यकाळाला २५ वर्षे पूर्ण झाली. मात्र, ऑक्टोबर २००१ मध्ये जेव्हा मी पहिल्यांदा पदाची शपथ घेतली होती, तो काळ जणू कालच घडल्यासारखा वाटतो; तेव्हा तुम्ही मला भरभरून प्रेम दिले होते, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.