गंगापूर, (प्रतिनिधी) : भगवंताचे नाम चिंतन हे मनुष्याच्या जीवनात बहुमोल असुन नरदेहाची प्राप्ती झालेल्या मानवाने सतत नामचिंतन करुन आपल्या जीवनाचे सार्थक करावे, असा मोलाचा सल्ला हभप प्रेममुर्ती नारायणानंदगीरीजी महाराज वैष्णव आश्रम सावखेडा यांनी काल्याच्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज याच्या गवळणीपर प्रकरणातील अभंगावर सुश्राव्य हरीकीर्तन सेवा संपन्न करताना उपस्थित भाविकांना दिला.
वाळूज येथील मनिषानगरात हनुमान जयंतीचे औचित्य साधून त्रिदीनात्मक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्याची सांगता शनिवार रोजी सकाळी काल्याच्या हरीकीर्तनानंतर महाप्रसादाने करण्यात आली. महाराजांनी संताचे विविध उदाहरणे देऊन भाविकांना भगवंताच्या नामाचे महत्त्व विषद केले. देवाच्या नावातच ताकद असुन कलीयुगात नामचिंतना शिवाय
पर्याय नाही, म्हणून मनुष्याने एकही क्षण वाया न घालवता परमार्थाची साधना करावी. अहंकार विरहीत भक्ती देवाला आवडते. अहंकार हा माणसाचा शत्रु आहे.
आपण करत असलेली परमार्थ साधना कुणाला सांगुच नये. भगवंत हा भक्तीचा भुकेला असुन निस्सीम श्रद्धा भक्तीच देवाला आवडते असे त्यांनी शेवटी स्पष्ट केले. किर्तना नंतर शेवटी दहीहंडीचा अभंग होऊन, दहीहंडी फोडुन महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी कार्यक्रमास असंख्य भाविकांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तरुणवर्गासह मनिषानगर येथील नागरिकांनी परीश्रम घेतले.














