नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेचा ७.८ टक्क्यांच्या विकासदर अर्थात ग्रोथ आणि आर्थिक प्रगतीवर प्रश्न उपस्थित करणार्या विरोधकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ज्यांनी भारताला सर्वात कमकुवत देशांच्या यादीत ढकलले, ते आज जीडीपीवर प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यांना आज देशाची ही वेगवान आर्थिक घोडदौड पचवणे कठीण जात आहे. मोदी दिल्लीच्या श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्सच्या शताब्दी सोहळ्यात बोलत होते.
भारतीय अर्थव्यवस्थेतील सकारात्मक बदल आणि ७.८% एवढ्या प्रभावी तिमाही जीडीपी विकास दरावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार्या विरोधकांना उद्देशून मोदी म्हणाले, ज्यांनी एकेकाळी भारताला फ्रजाइल ५ ( ५) देशांच्या यादीत ठेवले होते, त्यांना आता देशाची आर्थिक प्रगती आणि विकासाची आकडेवारी पचवणे अवघड जात आहे. एवढेच नाही तर, विरोधकांना निराशावादी आणि ईश्वरनिंदक म्हणत, देशाच्या प्रगतीमुळे चिडलेले लोक खोटे बोलण्याची मोहीम चालवत आहेत, मात्र शेवटी विजय सत्य शक्तीचाच होईल, असेही मोदी म्हणाले.
विरोधी पक्षांवर मिश्कील टीका करताना मोदी म्हणाले, समाजात अथवा घरातही काही नाराज फुफा असतात. ज्या प्रत्येक चांगल्या कामात काही तरी त्रुटीच शोधायची सवय लागलेली असते. तशीच अवस्था विरोधकांची झाली आहे. मग ते यूपीआय असो किंवा नवीन संसद भवन असो अथवा बुलेट ट्रेन असो. प्रत्येक नव्या उपक्रमात ते याची काय गरज होती? असेच विचारतात.
दिमागी नक्षलवर पुन्हा बोलले मोदी, म्हणाले होमिओपॅथीची गोळी... -
स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिमागी नक्षल असा शब्द प्रयोग केला होता. त्यावरून झालेल्या गदारोळासंदर्भात बोलताना ते म्हणाले, मी तर फक्त एक होमिओपॅथीची गोळी दिली होती आणि सर्व दिमागी नक्षल हळूहळू बाहेर आले. आता देशातील जनता अशा मानसिकतेचे खरे रूप समजले आहे.
राज ठाकरेंचा मात्र पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
मोदींनी वाढलेल्या जीडीपीवर भाष्य केले त्यावर बोलताना राज ठाकरे यांनी तीव्र शब्दात आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी नरेंद्र मोदींनी परदेशात असताना सांगितले की, कोणीही परदेशात जाऊ नका. मला ही गोष्टच फार आवडली की, परदेशातून भारतीयांना सांगायचे परदेशात जाऊ नका. सोने खरेदी करू नका आणि भारतात सांगितले जात आहे की, आमचा देशाचा जीडीपी ७.८ टक्के आहे. जो अमेरिका आणि चीनपेक्षा देखील जास्त आहे. मग परदेशात का जायचे नाही? मग सोने का खरेदी करायचे नाही? घरामध्ये जेव्हा चणचण असते, तेव्हाच काटकसर सुरू होते ना. ७.८ टक्के आपला जीडीपी ग्रोथ आहे, मग या देशातल्या लोकांनी परदेशात का फिरायला जायचे नाही? त्यांनी का सोने खरेदी करायचे नाही? याचे कारण संपूर्ण देशाची आर्थिक परिस्थिती ही ढासळलेली आहे. पुढे पुढे आर्थिकदृष्ट्या काय काय गोष्टी घडतील. आता फक्त नीटच्या प्रकरणात जेन झी तरुण रस्त्यावरत आलेत, उद्या अख्खा देश रस्त्यावरती येईल.
आपण गांभीर्याने विचार करण्याची गोष्ट आहे की, आपण नक्की चाललोय कुठे आणि आपण काय करतोय?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राज ठाकरे पुढे म्हणाले की, तुम्हाला या सगळ्या गोष्टीत फक्त गुंतवून ठेवायचे आहे. जातीच्या वादात, धर्माच्या वादात गुंतवून ठेवायचे, तुम्ही या वादात गुंतून राहिलेत की बाकीचे प्रश्न विचारायला तुम्ही मोकळे नसतात. देशात सर्वाधिक बेरोजगारीचे प्रमाण आज वाढलेले आहे. इतकी भयानक परिस्थिती आता देशामध्ये आहे. हे आता सरकारचे किंवा भारतीय जनता पक्षाचे आंधळेपणाने फॉलो करणारे लोक आहेत, त्यांच्यावर जाऊ नका. कारण ते आता बोलत आहे ते स्वतःची समजूत काढत आहेत. ते बाकी दुसरं काही करत नाही. त्यांना वस्तुस्थिती आणि परिस्थिती माहितीच नाही. त्यांना जे वरतून व्हॉट्सअॅप पाठवले जातात, ते वाचतात, पाठ करतात आणि तुमच्याशी बोलायला लागतात,फफ असे त्यांनी म्हटले. २०२१ ते २६ मध्ये ज्या परदेशी कंपन्या भारतात आल्या, त्यातील ५०३ कंपन्यांनी कामकाज बंद केले आहे म्हणजे नोकर्या किती गेल्या याचा अंदाज बांधा. हा डेटा मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेरचा डेटा आहे. व्हॉट्सअॅपवर आलेला नाही, असे देखील राज ठाकरे यांनी म्हटले.