राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड करण्याची मागणी

Foto
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांची निवड करा, अशी मागणी आमदारांकडून करण्यात आल्यानंतर आता पक्षातील प्रमुख पदाधिकार्‍यांनीही ही मागणी उचलून धरली आहे. त्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत गोटात हालचाली सुरु झाल्या आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वात पक्षातील ३० हून अधिक प्रमुख पदाधिकार्‍यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पक्षाचे अध्यक्ष बनवा, अशी मागणी केली आहे. त्यांनी हे पत्र सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांना पाठवले आहे. त्यामुळे आता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदानंतर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रेही हातात घेणार का, हे पाहावे लागेल.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर प्रफुल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची थेट माहिती केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली होती. मात्र, आपल्याला एका पत्रकाराने चुकीची माहिती दिल्याचे स्पष्टीकरण गोयल यांनी दिले होते. प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहेत, अशी चुकीची माहिती एका वरिष्ठ पत्रकाराने मला दिली होती. मात्र, मी कुठलीही अधिकृत माहिती घेतल्याशिवाय एका मुलाखतीत यासंदर्भात वक्तव्य केलं. पण, माझी माहिती चुकीची असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करत आहे, असे स्पष्टीकरण गोयल यांनी दिले होते.