मुंबई : राज्यातील सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवरुन आज सभागृहात चांगलाच गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. येथील जिल्हा परिषदेत संख्याबळ नसूनही भाजपने रडीचा डाव खेळत आपला अध्यक्ष बसवला. त्यासाठी पोलीस अधिक्षकांनी मदत केल्याचा आरोप शंभूराज देसाई यांनी केला. त्यानंतर, शिवसेना मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दालनात आक्रमक भूमिका घेतली. तर, दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी सभागृहात शिंदेंच्या मंत्र्यांना डिवचलं. मंत्री मार खातायत आणि हे साधं भाजपचं नाव घ्यायला देखील घाबरत आहेत. भाजप तुम्हाला चिरडतेय आणि तुम्ही फक्त मार खाताय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मंत्र्यांने देखील मार खाल्ला, असे म्हणत परब यांनी साताऱ्यातील वादावरुन सभागृहात जोरदार चिमटे काढले.
शिवसेना मंत्री आणि आमदार साताऱ्यातील गैरप्रकाराविरोधात आक्रमक झाले असून शिवेसना आमदारांची एकनाथ शिंदेंसोबत बैठक झाली. एकनाथ शिंदेंनीही घडलेल्या प्रकाराबाबत नाराजी बोलून दाखवली. सत्ताधारी मंत्री आणि आमदारांना मिळणारी दुय्यम वागणूक न खपणारीच असल्याचं सांगितलं. इतकंच नाही तर आम्ही राजीनामा देऊ, अशी भूमिका शिवसेना मंत्र्यांने एकनाथ शिंदेच्या समोर बोलून दाखवली होती. तर, साताऱ्याचे एसपी तुषार दोशी यांना निलंबित करण्याचे आदेश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. मात्र, अद्यापही सभागृहात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी आक्रमक भूमिका घेत शिंदेंच्या शिवसेना नेत्यांना, मंत्र्यांना डिवचलं. आता हे वाघ कुठे गेले? नुसता मार खात आहेत, असे म्हणत अनिल परब यांनी शिवसेना नेत्यांना डिवचलं.
साताऱ्यात दोन राजांना मारलं
उपसभापती यांनी सकाळी एसपी ला निलंबित केल. काही दिवसांपूर्वी खालच्या सभागृहात तालिका अध्यक्ष यांनी एका अधिकाऱ्याला निलंबित केलं. पुन्हा त्याला पदावर घेण्यात आलं आहे. आता, उपसभापती यांनी निलंबन केलं. आता, त्यांच्यावर अविश्वास ठराव आणणार आहात का?. कल्याणमध्ये तत्कालीन एसपी परमबीरसिंहने त्रास दिला म्हणून यांच्या मंत्र्याने व्यासपीठावर राजीनामा दिला होता. आता कुठे गेले ते वाघ? मार खाण्यापेक्षा मारा सत्तेला लाथ आणि पडा ना बाहेर. पण, तुम्हाला भाजपच नाव सुद्धा घ्यायला घाबरायला होत आहे. सातारामध्ये दोन राजांना मारलं, दोन राजे मार खातात, साक्षात शंभुराजे देसाई यांना मारलं आहे, अशा शब्दात अनिल परब यांनी साताऱ्यातील भाजप विरुद्ध शिवसेनेच्या राड्यावर खडाजंगी भाषण केलं.
महाराष्ट्राच्या एपस्टिन फाईलबाबत सरकारचं धोरण काय?
महाराष्ट्रात सगळे प्रश्न संपले आहेत आणि समोर काय येत आहे. मंत्री मार खातोय, भोंदू बाबा मोठ्या लोकांना फसवतो, लैंगिक अत्याचार करतो आणि तुम्ही काहीच करत नाही. महाराष्ट्राच्या या एपस्टिन फाईलबाबत सरकारच काय धोरण आहे हे स्पष्ट व्हायला पाहिजे, अशी मागणीही अनिल परब यांनी केली.
आम्ही हतबल नाहीत
शंभूराज देसाईंनी अनिल परब यांच्या भाषणाला प्रत्युत्तर दिले असून सातारामध्ये जो प्रकार घडला तो आपल्याला निदर्शनास आणून द्यायचा होता. परब म्हणाले की, आम्ही उठाव केला. पण, त्यावेळी त्यांचे प्रेते येतील, कोथळा बाहेर काढू असे म्हटले जात होते. परंतु काय झालं, आम्ही पुन्हा आलो, सन्मानाने आलो. काय केलं यांनी? आम्हाला आता डिवचू नका. आता आम्ही सत्तेत आलो आणि कालसारखे काही कटू अनुभव देखील आले आहेत. याचा अर्थ आम्ही हतबल आहोत असा अर्थ काढू नये, असे शंभूराज देसाईंनी म्हटलं.