नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या प्राणघातक बॉम्बस्फोटाच्या चौकशीत भारताला मदत करण्याचा प्रस्ताव अमेरिकेने दिला आहे. याचबरोबर अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी भारतीय तपास अधिकारी या प्रकरणाच्या चौकशीची हाताळणी अत्यंत योग्य पद्धतीने करत असल्याचे म्हटले आहे. जी-7 परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीनंतर कॅनडामध्ये पत्रकारांशी बोलताना रुबियो म्हणाले की, अमेरिका या प्रकरणात भारताच्या पाठिशी आहे.
आम्ही भारताला दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासात मदत करण्याचा प्रस्ताव दिला आहे, पण मला वाटते की या प्रकरणाचा तपास करण्यास ते सक्षम आहेत. त्यांना आमच्या मदतीची गरज नाही आणि ते चांगले काम करत आहेत, असे मार्को रुबियो यांनी म्हटले आहे.
दिल्लीतील या हल्ल्याचा जगभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. नवी दिल्लीतील अमेरिकन दूतावासानेही याचा निषेध केला आहे. राजदूत सर्जियो गोर यांनी 11 नोव्हेंबर रोजी एका पोस्टमध्ये म्हटले होते की, ङ्गङ्घकाल रात्री नवी दिल्लीत झालेल्या भयानक स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. यातील जखमींनी लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना करतो.
यापूर्वी, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी जी-7 परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीच्या वेळी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांची भेट घेतली होती. यावेळी दोन्ही नेत्यांनी विविध द्विपक्षीय आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली, ज्यामध्ये दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाचाही समावेश होता.
डॉ. उमर उन नबी घडवून आणला स्फोट
दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट घडवून आणणारा व्यक्ती काश्मीरमधील डॉ. उमर उन नबी होता, असे डीएनए चाचणीतून स्पष्ट झाले आहे. स्फोटात त्याच्या शरीराच्या चिंधड्या झाल्या होत्या, त्यामुळे तपास यंत्रणेला त्याची ओळख अद्याप पटलेली नव्हती. तपास यंत्रणेला सुरुवातीलाच संशय आला होता की, बॉम्बस्फोट करणारा व्यक्ती डॉक्टर उमर होता, ज्याने स्फोटाच्या फक्त 11 दिवस आधी हल्ल्यात वापरलेली पांढरी हुंडई आय20 खरेदी केली होती. काश्मीरच्या पुलवामा येथील त्याच्या कुटुंबातील सदस्यांचे घेतलेले डीएनए नमुने नंतर कारमधून सापडलेल्या मानवी अवशेषांशी जुळले, ज्यामुळे हे स्पष्ट झाले की डॉक्टर उमर हा स्फोट झाला तेव्हा हुंडई आय20 चालवत होता, असे सूत्रांनी सांगितले.