कन्नड, (प्रतिनिधी): येथील हिराजीबाबा यात्रेत ५ एप्रिलच्या रात्री अनेक हलांचे दागिने चोरीस गेले. या प्रकरणात दोन महिलांना अटक करून कन्नड न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
पिशोर येथे हिराजीबाब यात्रा सुरु आहे. यात्रेत बांगडी बाजार परिसरात गर्दीचा फायदा घेत ५ एप्रिल राजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास दोन महिलांनी अत्यंत चलाखीने गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व मणी असलेली पोत लंपास केली. या चोरीमध्ये तब्बल ४६ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळविला. या घटनेची माहिती मिळताच पिशोर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत आरोपींचा माग काढत हसनाबाद, (ता. भोकरदन, जि. जालना) वर्षा परमेश्वर चव्हाण, शायरी कांतीलाल भोसले (रा. जिवरण टाकळी, हल्ली मुक्काम जालना) यांना अटक केली.
चोरीस गेलेल्या मुद्देमाला पैकी काही माल त्यांच्याकडून जप्त केला. या आरोपी महिलांना ६ एप्रिल रोजी कन्नड न्यायालयात हजर करण्यात आले, असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणी पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव नागवे यांनी दिली.














