हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून बार कौन्सिलला फटकार

Foto
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्या. सूर्यकांत यांनी देशातील बेरोजगार तरुणांना उद्देशून कॉकरोच अशी संभावना केल्यानंतर देशभरामध्ये झालेला अभूतपूर्व विरोध आजही कायम आहे. सूर्यकांत यांच्या हस्ते हैदराबाद येथील नालसार  विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी दीक्षांत समारंभात पदवी स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर पुन्हा एकदा वादंग उठलं होतं. यानंतर बार कौन्सिल ऑफ इंडियाने तडकाफडकी भूमिका घेत संबंधित विद्यार्थ्यांना नोंदणी करण्यास नकार दिला होता. मात्र  आता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनीच बार कौन्सिल ऑफ इंडियाला कडक शब्दांमध्ये फटकारलं आहे. दुसरीकडे कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या भूमिकेवर सर्व कायदेशील कॉकरोच एकत्र आल्यास काय होईल? अशी विचारणा केली होती. यानंतर बार कौन्सिल ऑफ इंडियाने तलवार म्यान केली होती. यानंतर आता सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सुद्धा फटकारलं आहे.
 
माझा आणि विद्यार्थ्यांचा प्रश्न असताना यामध्ये बार कौन्सिलला पडायची काय गरज? अशा शब्दांमध्ये सूर्यकांत यांनी विचारणा केली. सूर्यकांत यांनी सांगितले की, नालसार विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी मला पत्र लिहिलं आणि विद्यार्थ्यांना शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्यांनी पुढं सांगितलं की, मी विद्यार्थी असतानासुद्धा आंदोलनं केली आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांवर बार कौन्सिल किंवा विद्यापीठाने कोणतीही कारवाई करू नये असे सूर्यकांत यांनी सांगितले. 

कॉकरोच संबोधतात त्यांच्या हातून पदवी घ्यायची का? 
नालसार विद्यापीठामध्ये दीक्षांत सोहळ्यासाठी सरन्यायाधीशांना निमंत्रित करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या एका गटाकडून सूर्यकांत यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यावरून कडाडून विरोध करण्यात आला. जे विद्यार्थ्यांना कॉकरोच संबोधतात त्यांच्या हातून पदवी घ्यायची का? अशी विचारणासुद्धा विद्यार्थ्यांनी करत विद्यापीठ प्रशासनाला पत्र लिहिलं होतं. या संदर्भामध्ये वादंग माजल्यानंतर आणि बार कौन्सिलने घेतलेल्या भूमिकेनंतर हे प्रकरण पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचलं. त्यानंतर सूर्यकांत यांनी बार कौन्सिलला फटकारलं. दरम्यान न्यायमूर्ती बागची यांनी विद्यार्थ्यांची वकिली रोखण्यासाठी बार कौन्सिलची बैठक झाली होती का? अशी विचारणा केली. 

सरन्यायाधीशांच्या वक्तव्यानंतर कॉकरोच पार्टी आली
दरम्यान, मे महिन्यात एका प्रकरणात सुनावणी करताना सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका खटल्याची सुनावणी करताना देशातील बेरोजगार तरुणांना झुरळे म्हटले होते. ते म्हणाले,काही बेरोजगार तरुण झुरळांसारखे असतात, जे नंतर मीडिया, सोशल मीडिया किंवा आरटीआय कार्यकर्ते बनतात आणि व्यवस्थेवर हल्ला करू लागतात. सरन्यायाधीश आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने एका वकिलाच्या ज्येष्ठ वकील दर्जा मिळवण्याच्या याचिकेवर सुनावणी घेतली. खंडपीठाने वकिलाला फटकारत म्हटले, समाजात आधीच असे परजीवी आहेत जे व्यवस्थेवर हल्ला करतात. खंडपीठाने म्हटले की, जगातील प्रत्येकजण ज्येष्ठ वकील होण्यास पात्र असेल, पण तुम्हाला त्याचा हक्क नाही. दिल्ली उच्च न्यायालयाने तुम्हाला ज्येष्ठ वकील म्हणून नियुक्त केले तरी, सर्वोच्च न्यायालय तुमच्या वर्तणुकीच्या आधारावर तो निर्णय रद्द करेल. यानंतर अभिजित दिपके यांनी केलेल्या उपरोधिक ट्विटनंतर सोशल मीडियात अभूतपूर्व क्रांती होऊन कॉकरोच पार्टी जन्माला आली. यानंतर या पार्टीच्या आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर धर्मेंद प्रधान यांची विकेट पडली.