हा माझा अपमान... मल्लिकार्जुन खरगे संतापले; शुद्धीकरणावरून राज्यसभेतील वातावरण तापले

Foto
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या ८ ऑगस्टला उत्तराखंडमधील हल्द्वानी येथील रामलीला मैदानावर झालेल्या विजय शंखनाद रॅलीनंतर आता राजकारण चांगलेच तापले आहे. खरगे रॅली करून परतले पण त्यांच्या निघून गेल्यानंतर रामलीला मैदानावर झालेल्या शुद्धीकरण यज्ञाच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजपा आमनेसामने आले आहेत. राज्यसभेत या मुद्द्यावरून गदारोळ झाला. त्यात खरगे यांनी भाजपाला धारेवर धरले.

राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, मी कधी माझ्या एससी असण्याचा मुद्दा बनवला नाही. परंतु शुद्धीकरण करून माझा अपमान केला गेला. हल्द्वानी येथे जनसभेला संबोधित करताना मी रामलीला मैदानावर भाषण केले. तिथे लाखो लोक उपस्थित होते. त्यावेळी मी कुठल्याही समाजाचे अथवा धर्माचे नाव घेतले नाही. मी केवळ लोकांच्या समस्या तिथे मांडल्या. परंतु माझे भाषण संपल्यानंतर दुसर्‍या दिवशी तिथे काही लोकांनी शुद्धीकरण यज्ञ केला. या घटनेने मी व्यथित झालो आहे असं सांगत खरगे यांनी भाजपावरही निशाणा साधला.

सरकारकडून या कृत्याचा निषेध...
दरम्यान खरगे यांच्या टीकेवर केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी उत्तर दिले. सरकार या कृत्याचा निषेध करते आणि या प्रकरणाची चौकशी केली जाईल. परंतु भाजपा अशा कृत्याचे समर्थन करत नाही. मी तुमच्या भावना समजू शकतो. आमच्यासाठीही हे खेदजनक आहे. मात्र वारंवार हे भाजपाने केले असं म्हणू नका. भाजपा अशा कृत्याचे समर्थन करत नाही असं नड्डा यांनी खरगे यांना म्हटले. त्यावर मी नड्डा यांचे नाव घेतले नाही. या प्रकरणाची दखल घेत गुन्हा नोंदवावा. ज्या लोकांनी हे केले त्यांना अटक करावी हीच आमची मागणी आहे असं खरगे यांनी सभागृहात सांगितले.

दरम्यान, राज्यसभा सभापतींनी या घटनेवर तीव्र आक्षेप घेतला. जर अस्पृश्यता हे पाप नसेल, तर या जगात दुसरे कोणतेही पाप नाही. आपला पक्ष कोणताही असो आपण सर्वजण त्याचा निषेध करतो. ज्यांनी हे केले आहे, त्यांना पकडले पाहिजे यात काहीही शंका नाही असं सभापतींनी मत मांडले. 

काय आहे प्रकरण?
मल्लिकार्जुन खरगे यांच्या रामलीला मैदानावरील कार्यक्रमानंतर श्रीराम सेनेद्वारे व्यासपीठावर शुद्धीकरण यज्ञ करण्यात आला. खरगे हिंदू आणि सनातनीविरोधी आहेत. ज्या मैदानात रामलीला आयोजित केली जाते तिथे अशा व्यक्तीच्या आल्यानंतर शुद्धीकरण करणे गरजेचे होते असा दावा या संघटनेतील सदस्यांनी केला. मात्र या प्रकारानंतर काँग्रेसने भाजपावर निशाणा साधला. भाजपाशी जोडलेले लोक हे करत आहेत. ते मागासवर्गीय विरोधी आहेत असा आरोप काँग्रेसने केला.