बारामती : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाचे चित्र आता स्पष्ट झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) उमेदवार आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी विजयाकडे मोठी झेप घेतली आहे. नवव्या फेरीअखेर मिळालेल्या आकडेवारीनुसार, सुनेत्रा पवार यांचा विजय आता केवळ औपचारिकता उरला आहे. विजयाचे चित्र स्पष्ट होताच सुनेत्रा पवार यांनी एक्सवर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या.
सुनेत्रा पवार म्हणाल्या की, ङ्गङ्घआज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना आपण सर्वांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास मी आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करते. आजचा हा निकाल जाहीर होत असताना आदरणीय दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने आपण सर्वजण भावूक आहोत. दादांवर जीवापाड प्रेम करणार्या सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की, या विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये. आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया
बारामतीकरांचे आभार मानताना त्यांनी भविष्यातील वाटचालीचे संकेत दिले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, ङ्गङ्घहा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे. निर्धाराची, संघर्षाची आणि नव्या बारामतीची! दादांच्या स्वप्नातील बारामती घडवण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वांची ऋणी आहे.ङ्घङ्घ या विजयामुळे बारामतीच्या राजकीय वर्तुळात सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व अधिक भक्कम झाले असून, नव्या बारामतीच्या निर्मितीसाठी त्यांनी आता कंबर कसली आहे.
बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत पहिल्या फेरीपासूनच सुनेत्रा पवार यांनी आपले वर्चस्व कायम राखले. अत्यंत चुरशीच्या मानल्या जाणार्या या निवडणुकीत नवव्या फेरीअखेर सुनेत्रा पवार यांनी ७७ हजार १०३ मतांची प्रचंड आघाडी घेत विजयाच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकले. अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी झालेली ही निवडणूक कौटुंबिक आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानली जात होती.