१९९४ च्या मुख्यमंत्र्यांचे हे पाप...! मग आजपर्यंत तुम्ही काय करताय? विखे पाटलांच्या टीकेवर शरद पवारांचा पलटवार

Foto
बारामती :  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे गेल्या सहा दिवसांपासून उपोषण सुरु आहे. मनोज जरांगेच्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट करताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली. मराठा आरक्षणासाठी सरकारने आतापर्यंत केलेल्या उपाययोजनांची माहिती देतानाच विखे पाटील यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. त्यांच्या या वक्तव्यानंतर बारामतीमध्ये बोलताना शरद पवार यांनीही मोजक्या शब्दांत पलटवार करत आजपर्यंत तुम्ही काय करताय? असा सवाल उपस्थित केला.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. सरकारकडून त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले असून, प्रशासनाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत सरकारची भूमिका पोहोचवण्यात आल्याची माहिती मंत्र्यांनी दिली. तसेच मराठा आरक्षणासंदर्भातील प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी शिंदे समिती पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे जाणार असल्याचेही सरकारकडून सांगण्यात आले.

१९९४ मध्ये निर्णय घेतला असता तर आजची वेळ आली नसती
पत्रकार परिषदेत बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताना १९९४ सालाचा संदर्भ दिला. त्यावेळी मराठा समाजाचा मंडल आयोगाच्या प्रक्रियेत समावेश करण्यात आला असता, तर आज हा प्रश्न इतका गंभीर नसता, असा दावा त्यांनी केला.

१९९४ साली मंडल आयोगाच्या शिफारसी स्विकारल्या असत्या आणि मराठा समाजाचा अंतर्भाव केला असता तर हा इतिहास घडला नसता.  १९९४ साली जे मुख्यमंत्री होते, हे त्यांचं पाप आहे. मात्र, आम्ही आता प्रयत्न करत आहोत, अशा शब्दांत विखे पाटील यांनी नाव न घेता शरद पवार यांच्याकडे बोट दाखवले.

शरद पवारांचा मोजक्या शब्दांत पलटवार
विखे पाटील यांनी १९९४ सालातील तत्कालीन सरकारवर टीका केल्यानंतर शरद पवार यांनीही या आरोपांना मोजक्या शब्दांत उत्तर दिले. १९९४ पासून आजपर्यंत तुम्ही काय करताय? ९४ पासून सहा वर्षे आणि आता २६ वर्षे झाली, असा सवाल करत पवारांनी विखे पाटील यांना प्रत्युत्तर दिले. आज काही मंत्री मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांना सरकारचा निर्णय सांगणार आहेत. तो निर्णय काय आहे ते बघूयात, असेही शरद पवार म्हणाले.