सिल्लोड, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृतच्या वतीने सुरू असलेल्या पराक्रम दिनी उपक्रमाचे औचित्य साधून सिल्लोड येथे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठान चे अध्यक्ष मकरंद कोरडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते थोरले बाजीराव पेशवे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
अमृतचे जिल्हा उपव्यवस्थापक योगेश रोडे, राज काम्प्युटरचे संचालक सचिन उपळीकर, संजय कुलकर्णी, अनिल कुलकर्णी, निलेश सोनटक्के यांच्यासह गणेश झाल्टे, योगेश जोशी, अमोल कुलकर्णी, गणेश कुलकर्णी, मयूर कुलकर्णी, विवेक व्यवहारे, अजय इंगे, वैभव जोशी, अनिल भाले, रोहित कुलकर्णी, महेंद्र कुलकर्णी, पद्माकर नागपुरे, अनिल गोमटे,
उदय सुरडकर, शंतनू सुरडकर, नागेश व्यवहारे, प्रणव इंगे, रुद्र कुलकर्णी, लक्ष्मीकांत देशपांडे, स्वाती पालोदकर, जयश्री उपळीकर, स्वाती कुलकर्णी, कोमल वैभव जोशी, सारिका योगेश कुलकर्णी, जयश्री अमित कुलकर्णी, भारती योगेश रोडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय कुलकर्णी यांनी केले. प्रास्ताविकात योगेश रोडे यांनी अमृतच्या माध्यमातून युवकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. युवकांनी नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगार व उद्योजकतेच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहावे,
तसेच स्वयंरोजगार व व्याज परतावा योजनेसह विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी अनिल भाले, योगेश जोशी, सचिन उपळीकर, योगेश रोडे आणि मकरंद कोरडे यांनी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जीवनचरित्र, पराक्रम, नेतृत्वगुण आणि कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकला. बाजीराव पेशव्यांनी आपल्या धाडसी नेतृत्वातून मराठा साम्राज्याचा विस्तार केला. त्यांचे शौर्य, दूरदृष्टी, संघटनकौशल्य, निर्णयक्षमता आणि ध्येयनिष्ठा आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे वक्त्यांनी सांगितले. योगेश रोडे यांनी मनोगतात युवकांनी इतिहासातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांकडून नेतृत्व, ध्येयवाद आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले.
मकरंद कोरडे यांनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून इतिहास, संस्कृती, सामाजिक एकोपा आणि युवकांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला. पराक्रम दिनाच्या निमित्ताने या कार्यक्रमातून युवकांना इतिहासाची प्रेरणा तसेच शासकीय योजनांची माहिती मिळाली. भविष्यात श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या माध्यमातून व्याख्याने, इतिहासविषयक उपक्रम, युवक मार्गदर्शन, सामाजिक उपक्रम आणि जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमास नागरिक, युवक व प्रतिष्ठानचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













