‘त्या’ १९४ कर्मचार्‍यांची दोन दिवस चालणार सुनावणी; महानगरपालिकेतील नोकर भरती प्रकरण

Foto

औरंगाबाद: मनपाच्या गाजलेल्या नोकर भरती प्रकरणात १९४ सफाई कर्मचार्‍यांना प्रशासनाच्यावतीने नोटीस बजाविण्यात आली होती. उद्या शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस सुनावणी होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
काही वर्षांपूर्वी झालेल्या मनपाचे  ११२४ कर्मचार्‍यांचा भरतीनंतर लाड समितीच्या शिफारशीने करण्यात आलेले नोकर भरती प्रकरण चांगलेच गाजले होते. यानंतर विधिमंडळात प्रकरण गाजल्यानंतर शासनाने तुकाराम मुंढे यांची प्रकरणी चौकशी करिता नियुक्ती केली. त्यानंतर मुंडे यांनी प्रकरणाची चौकशी करून विधिमंडळात यासंबंधी अहवाल सादर केला. 

या चौकशीदरम्यान ११ अधिकार्‍यांवर ठपका ठेवण्यात आलेला असून दोषी अधिकार्‍यांची विभागीय चौकशीची शिफारस देखील करण्यात आलेली आहे. यासह चुकीच्या पद्धतीने भरती करण्यात आलेल्या सफाई मजुरांना नोकरीतून कमी करण्याची कार्यवाही मनपा प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेली असून, याप्रकरणी प्रशासनाने १९४ सफाई मजुरांना नोटिसा देखील बजावलेल्या असल्याचे समजते. या सर्व प्रकरणाची शुक्रवार व शनिवार अशी दोन दिवस सुनावणी घेऊन प्रकरणांची छाननी करून संबंध नसताना किंवा कागदपत्रांची पूर्तता नसताना ज्यांना नियुक्त्या दिल्या गेल्या अशांना नोकरीतून कमी केले जाणार असल्याची चर्चा सध्या मनपा वर्तुळात ऐकायला मिळत आहे. यात कुणाची नोकरी जाणार यामुळे कर्मचार्‍यांमध्ये मात्र धाक धुक दिसून येत आहे.