जिल्हा व सत्र न्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकीने खळबळ, प्रशासन अलर्ट

Foto
सोलापूर: राज्यातील अनेक जिल्हा व सत्र न्यायालयांना बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी देण्यात आली आहे. ठाणे, सातारा, सोलापूर, अमरावती, बीड, हिंगोली अशा न्यायालयांना धमकी आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. यासंदर्भात पोलीस प्रशासन तपास करत आहे.

दरम्यान सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाला धमकीचा ई-मेल मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांकडून संपूर्ण न्यायालय परिसर निर्मनुष्य करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. न्यायालयातील न्यायाधीश, वकील आणि सर्व पक्षकारांना सुरक्षिततेच्या कारणास्तव न्यायालयाबाहेर काढण्यात आले आहे. धमकीच्या पार्श्वभूमीवर न्यायालय परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून, परिसराची तपासणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. धमकीचा ई-मेल नेमका कोठून आला, याबाबत तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे न्यायालय परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.

या धमक्यांमुळे राज्यातील विविध सत्र न्यायलयांमधील कामकाज थांबवण्यात आले. सकाळच्या सुमारास एका पाठोपाठ आलेल्या धमकीच्या ईमेलमुळे महाराष्ट्रातील न्यायव्यवस्था आणि पोलीस प्रशासन हादरून गेले.
ठाणे, नाशिक, बीड, हिंगोली, सातारा, परभणी, सांगली, पंढरपूर आणि सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयांच्या इमारती बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या ईमेलद्वारे प्राप्त झाल्या. या एकाच ईमेलमुळे संपूर्ण राज्यात प्रचंड खळबळ उडाली असून, खबरदारीचा उपाय म्हणून न्यायालये तातडीने रिकामी करण्यात आली आहेत.

धमकीचा ईमेल मिळताच पोलीस प्रशासनाची मोठी पळापळ झाली. ठाणे, नाशिक, सातारा, सोलापूर, हिंगोली आदी न्यायालयांना छावणीचे स्वरूप आले आले. नाशिकमध्ये पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. न्यायालय परिसरात कामकाज सुरू असल्याने न्यायाधीश, वकील, कर्मचारी, पक्षकार आणि मजुरांना सुरक्षेच्या कारणास्तव तातडीने इमारतीबाहेर काढण्यात आले.
बीड आणि हिंगोली न्यायालयांच्या पोर्टलवरही असाच मेसेज आल्याने संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. सर्व न्यायालयांची सुरक्षा कमालीची वाढवण्यात आली असून, हा खोडसाळपणा आहे की मोठा कट, याचा तपास पोलीस सायबर सेलच्या मदतीने करत आहेत. एकाच दिवशी राज्यातील प्रमुख न्यायालयांना लक्ष्य केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.