कन्नड, (प्रतिनिधी) : तालुक्यातील घुसूर येथील कथित बेकायदेशीर पुतळा प्रकरणात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. सत्र खटला क्र. २७९ / २०२५ मध्ये कल्याण काळे, संदीप नलावडे आणि संजय गुळवे या तिघांवर ग्रामपंचायत हद्दीत विनापरवाना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याचा आरोप होता. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र पुतळ्यांच्या पावित्र्यभंगास प्रतिबंध अधिनियम, १९९७अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
प्रकरण सत्र न्यायालयात दाखल झाल्यानंतर आरोपींनी गुन्हा कबूल न करता खटला चालवण्याचा निर्णय घेतला. आरोपींतर्फे अॅड. किरण मगर ठोस पुराव्याअभावी न्यायालयाचा निकाल पाटील यांनी सामाजिक भान ठेवून कोणतीही फी न घेता मोफत बाजू मांडली. निकालानुसार, अभियोजन पक्ष आरोपींविरुद्ध ठोस पुरावे सादर करण्यात अपयशी ठरला. विशेष म्हणजे, महत्त्वाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार न्यायालयात फिरले आहे. त्यांनी आरोपींच्या विरोधात साक्ष दिली नाही. फिर्यादीची साक्ष ऐकीव स्वरूपाची असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
तपासादरम्यान पुतळा कोणी बसवला. आणि तो कुठून आणला, याबाबत ठोस माहिती मिळाली नसल्याने आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे तिन्ही आरोपींना निर्दोष घोषित करण्यात आले.
न्यायालयाने आरोपींची जामीन बंधपत्रे रद्द करून नवीन जामीन देण्याचे आदेश दिले आहेत. हा निर्णय अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. पवार यांनी दिला. आरोपींतर्फे अॅड. किरण मगर पाटील यांनी बाजू मांडली.














