छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : निसर्ग कॉलनी, भीमनगर भावसिंगपुरा भागात अनैतिक संबंधाच्या संशयावरून दगडू मुरलीधर सदाफुले यांचा खून केल्याच्या आरोपातून जिल्हा व सत्र न्यायाधीश निखिल पी. मेहता यांनी तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. आरोपींविरुद्ध गुन्ह्याची साखळी सिद्ध करण्यात अपयश आल्याचे निरीक्षण न्यायालयाने निकालात नोंदवले आहे. या प्रकरणात कैलास रामदास देवरे, विनोद ऊर्फ बाळू विश्वनाथ निकाळजे आणि निर्मलाबाई गायकवाड अशी निर्दोष मुक्तता झालेल्यांची नावे आहेत.
फिर्यादी कडुबा मुरलीधर सदाफुले यांच्या तक्रारीनुसार, १८ जुलै २०२४ ला छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. आरोपींनी दगडू सदाफुले यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दगडाने ठेचून ठार केले, असा आरोप होता. खटल्याच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने केवळ रक्ताने माखलेले कपडे किंवा हत्यार मिळणे हा खुनाचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरेसा पुरावा ठरू शकत नाही असे स्पष्ट केले. तसेच हस्तगत केलेल्या वस्तूंवरील रक्ताचा गट निश्चित होऊ शकला नाही आणि ’एफएसएल’ अहवालातही ठोस निष्कर्ष नसल्याने न्यायालयाने संशयाचा फायदा देत संशयितांची सुटका केली. संशयितांतर्फे अॅड. संतोष सरदार, अॅड. विजय वाकळे यांनी काम पाहिले.












