वैजापूरमध्ये दोन दिवसांत तीन शेतकऱ्यांची कर्ज, दुष्काळाला कंटाळून आत्महत्या

Foto

वैजापूर कर्ज, नापिकी आणि सततच्या दुष्काळाने चिंताग्रस्त झालेला तरुण शेतकरी बुधवारी पाहाटेपासून बपत्ता होता. गुरुवारी सकाळी या कर्जबाजारी शेतकऱ्याचा मृतदेह कालव्यात सापडल्याने वैजापूर तालुक्यातील मस्की गावात खळबळ उडाली. तालुक्यात दोन दिवसांमध्ये तीन शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याने चिंतेचे वातावण आहे. सध्या विधानसभेचे अधिवेशन सुरु आहे. त्याच दरम्यान शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. आता तरी सरकार दुष्काळाच्या उपाययोजना जाहिर करणार की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

 

काय आहे प्रकरण

वैजापूर तालुक्यातील मस्की येथील रावसाहेब रामचद्र रिठे (२८) हा शेतकरी बुधवारी पहाटेच घरातून निघून गेला होता. त्याची पत्नी पहाटे ४ वाजता उठली तेव्हा रावसाहेब रिठे जागेवर नव्हता. तिने तास-दिडतास वाट पाहिली आणि पती सापडत नसल्याचे शेजारी आणि नातेवाईकांना सांगितले. मस्की गावातील ग्रामस्थांनी बुधवारी दिवसभर रावसाहेब रिठेचा शोध घेतला मात्र तो कुठेच सापडला नाही. पती हरवल्याची तक्रार देण्यात आली. सोशल मीडियावरही त्याचा फोटो आणि बेपत्ता झाला तेव्हा त्यांच्या अंगावरील कपड्यांचे वर्णन देण्यात आले होते.  गुरुवारी सकाळी मस्की गावा शेजारी असलेल्या हनुमंतगावातील कालव्यात रावसाहेब रिठेचा मृतदेह सापडला. घरातून बाहेर पडला तेव्हा त्याच्या अंगात भगवे टीशर्ट आणि पँट होती, त्याच कपड्यात पाण्यात पडलेल्या आवस्थेत त्याचा मृतदेह सापडला.

 

कर्ज आणि सततच्या नापिकीने झाला होता मनोरुग्ण

गावकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील चार-पाच वर्षांपासून सुरु असलेले दुष्काळाचे दुष्टचक्र आणि कर्जाचा वाढता डोंगर यामुळे २८ वर्षांचा तरुण शेतकरी रावसाहेब वेड्यासारखा करत होता. माझे कर्ज फिटत नाही, शेतात काही पिकत नाही असे तो नेहमी बरळत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. बँकेचा कर्जाचा तगादा आणि शेतात काही पिकत नाही या त्रासाला कंटाळून रावसाहेब रिठे यांनी आत्महत्या केली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.


वैजापूरमध्ये दोन दिवसांत तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या
वैजापूर तालुक्यात मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसांमध्ये तीन शेतकऱ्यांनी कर्ज आणि दुष्काळामुळे आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. सरकारने दुष्काळ जाहिर केला असला तरी, दुष्काळ निवारण्याच्या कोणत्याही उपाय योजना केलेल्या नाहीत. यामुळे शेतकऱ्यांसमोर आत जगायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

तालुक्यातील वीरगाव येथील दीपक थोरात या २२ वर्षीय तरुणाने बुधवारी राहात्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. वडिलांवर बँकेचे कर्ज आहे. शिक्षण घेऊनही आपल्याला नोकरी नाही. किती वर्षे बसून राहाणार याची चिंता त्याला सतावत होती, असे त्याच्या मित्रांनी सांगितले. वडिलांनी शेतीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे या चिंतेतूनच त्याने आत्महत्या केल्याची गावकऱ्यांमध्ये चर्चा होती. याच परिसरातील बाबतरा येथे अरुण भास्कर मुलिंद (३४) या शेतकऱ्याने मंगळवारी राहात्या घरी आत्महत्या केली. दोन दिवसांत दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने गावात चिंतेचे वातावरण आहे.