छत्रपती संभाजीनगर, (सांज वार्ता ब्युरो) : दुचाकी सर्व्हिसिंगला घेऊन जातो, असे सांगून घराबाहेर पडलेले तिघे मित्र हर्सूल तलावावर पोहोचले. तलावाच्या पाण्यात उतरले अन पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. अग्रिशमन दलाने तिघांचे मृतदेह बाहेर काढले. घटनेच्या काही वेळातच फिल्टरच्या कठड्यावरून आणखी एका तरुणाने उडी घेत आत्महत्या केली. या घटना रविवारी (दि.५) दुपारी ३ ते ३:३० वाजेदरम्यान घडल्या.
अफान इस्माईल खान (१६), मैशिद ऊर्फ आदिल मोहसीन शेख (१४, दोघेही रा. निजामगंज, भवानीनगर) या दोन मित्रांचा, तर त्यांना वाचवताना करण रामचंद्र मोरे (२२, रा. अंबरहील, जटवाडा रोड) तलावात बुडाला. दरम्यान, यश संदीप देहाडे (२५, रा. सिद्धार्थनगर, एन-१२ हडको) या तरुणाने या घटनेच्या काही वेळातच उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिस निरीक्षक स्वाती केदार यांनी दिली.
निजामगंज कॉलनीत रहाणारे अफान, मैशिद आणि वासिफ हे तिघे मित्र हसूल तलावात पोहण्यासाठी दुपारी एक वाजेच्या सुमारास गेले होते. अफान आणि मैशिद दोघे पाण्यात उतरले, तर वासिफ पोहोता येत नाही म्हणून तलावाच्या कडेला बसला होता. त्याठिकाणी आणखी एक तरुण पोहण्यासाठी आलेला होता. अफान आणि मैशिद एकमेकांचे हात धरून तलावात शिरले. काही अंतरावर पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही तलावाच्यामध्ये खोल खड्यात गाळामध्ये अडकले. एकाच वेळी दोघे पाण्यात बुडत असल्याचे पाहून अनोळखी तरुणाने पाण्यात उडी घेऊन दोघांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाने तिघेही काही कळण्याच्या आत पाण्यात बुडाले. त्याचवेळी बाहेर बसलेल्या वासिफने आरडाओरड सुरू केली. अफानच्या वडिलांना कॉल करून हर्सूल तलावात त्यांचा मुलगा आणि मैशिद बुडत असल्याचे सांगितले. आरडाओरड करूनही आसपास कोणीही नसल्याने त्यांना वेळेत मदत भेटली नाही. त्यानंतर मनपाचे सुरक्षारक्षक राजेंद्र गवळे यांनी अग्रिशमनला कॉल केला. काही वेळातच एन-९ अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लगेच पाण्यात उतरत तिघांचा शोध घेतला. तिघांचा मृतदेह बाहेर काढून त्यांनी घाटीत हलवले.














