छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : अवैधरित्या गांजाचा साठा करुन विक्री करणार्या तीन जणांना गुन्हेशाखा पोलिसांनी सापळा रचून गजाआड केले. या कारवाईत ९७ हजार ४६० रुपये किंमतीचा ४ लाख ८७३ ग्रॅम गांजा (कॅनबिस वनस्पती), १५ लाख रुपये किंमतीचा एक ट्रक, २१ हजार रुपये किंमतीचे तीन मोबाईल, रोख रक्कम २ हजार रुपये असा एकूण १६ लाख २० हजार ४६० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती गुन्हेशाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी मंगळवारी (दि.२४) दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख मोहम्मद खालीद शेख नईम, रा. सादात नगर, सातारा परिसर, शेख अकील शेख सलीम, रा. जहागिरदार कॉलनी, रेल्वेस्टेशन परिसर, मोहम्मद मंन्सूर शेख, रा. सादातनगर, रेल्वेस्टेशन परिसर अशी आरोपींची नावे आहेत. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील करोडी शिवारात ट्रक क्रमांक (एमएच-१७-बीवाय-६९७४) या ट्रकमधून गांजाची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती गुन्हेशाखेला मिळाली होती.
गुन्हेशाखेचे पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले, सहाय्यक आयुक्त अशोक राजपूत, पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप काळे, पोलिस अंमलदार संदीप तायडे, कैलास काकड, योगेश नवसारे, राहुल बंगाळे, अमोल मुगळे, शेख जुनेद, अक्षय नाटकर, सागर साळवे, तातेराव शिनगारे, दादासाहेब झारगड आदींच्या पथकाने करोडी शिवारात सापळा रचून ट्रक ताब्यात घेतला. ट्रकची झडती घेतली असता ट्रकमध्ये चालकाच्या सिटमागे लपवून ठेवलेल्या बॉक्समध्ये ४ किलो ८७३ ग्रॅम गांजा मिळून आला.













