खुलताबादेत तीन दिवसीय प्रशिक्षण

Foto
जनगणनेला १ मे पासून होणार सुरुवात

खुलताबाद, (प्रतिनिधी) : आगामी जनगणना २०२७ च्या पार्श्वभूमीवर खुलताबाद शहरात तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली आहे. स्थानिक नगरपरिषद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रमात विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. संपूर्ण परिसरात शिस्तबद्ध व अभ्यासपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे.


मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण : हे तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिर आगामी जनगणना प्रक्रियेसाठी सक्षम, प्रशिक्षित आणि जबाबदार मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असून, यामुळे खुलताबाद शहरातील जनगणना कार्य अधिक प्रभावी, अचूक आणि यशस्वीपणे पार पडेल, असा विश्वास जनगणना चार्ज अधिकारी तथा मुख्याधिकारी समीर शेख यांनी व्यक्त केला.
?
सर्वेक्षण करताना नागरिकांशी संवाद साधताना संयम बाळगा :
प्रशिक्षणाच्या उद्घाटन सत्रात प्रा. राजेश राठोड यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन करताना जनगणनेचे राष्ट्रीय स्तरावरील महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, जनगणना ही केवळ आकडेवारी संकलनाची प्रक्रिया नसून देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि विकासात्मक धोरणांचा भक्कम पाया आहे. त्यामुळे प्रत्येक घरापर्यंत अचूक, विश्वसनीय आणि संपूर्ण माहिती पोहोचविणे ही जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली गेली पाहिजे. सर्वेक्षण करताना नागरिकांशी संवाद साधताना संयम, आदर आणि विश्वास यांचा समतोल राखणेही तितकेच आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार :
या प्रशिक्षण शिबिरात घरगुती माहिती संकलनाची पद्धत, डिजिटल साधनांचा प्रभावी वापर, माहिती नोंदणीतील अचूकता, नागरिकांशी संवाद कौशल्य, तसेच गोपनीयतेचे काटेकोर पालन या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रशिक्षणादरम्यान प्रत्यक्ष उदाहरणे, प्रात्यक्षिके आणि संवादात्मक सत्रांद्वारे प्रशिक्षणार्थीना कार्यपद्धतीची स्पष्ट समज दिली जात आहे. त्यामुळे प्रत्यक्ष जनगणना कार्यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे.

सोयीसुविधांकडे विशेष लक्ष :
या कार्यक्रमाला मुख्याधिकारी समीर शेख, कार्यालयीन अधीक्षक रुस्तम फुलारे, जितेंद्र बोचरे, अंकुश भराड, मनिषा लघाणे, प्रज्ञा पवार आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनीही प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन करताना जनगणना प्रक्रियेत शिस्त, अचूकता आणि जबाबदारी यांचे महत्त्व अधोरेखित केले. प्रशिक्षणार्थीसाठी पिण्याचे पाणी, चहा, नाश्ता व जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली असून, नियोजनबद्ध आयोजनामुळे सहभागींच्या सोयीसुविधांकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.