विजेचा शॉक लागून तिघांचा मृत्यू

Foto
मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह आणि धामधूम सुरू असतानाच, मुंबई महानगरपालिकेच्या कंत्राटदाराचा अत्यंत निष्काळजी आणि ढिसाळ कारभार समोर आला आहे. जोगेश्वरी पूर्वेतील श्याम नगर तलावाजवळील कृत्रिम तलावात गौरी-गणपती विसर्जन करत असताना विजेचा तीव्र शॉक लागून रोहित भीमसिंग राठोड या अवघ्या १९ वर्षांच्या तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. आईचे छत्र आधीच हरपलेल्या या तरुणाच्या अचानक जाण्याने त्याच्या वृद्ध वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण जोगेश्वरी परिसरात तीव्र संतापाची लाट पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी जोगेश्वरी पूर्व येथील ट्रॉमा केअर हॉस्पिटलच्या जवळील श्याम नगर तलाव परिसरातील पालिकेच्या कृत्रिम तलावात गौरी-गणपती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. रोहित राठोड हा १९ वर्षीय तरुण तिथे विसर्जनासाठी गेला होता. विसर्जन सुरू असतानाच कृत्रिम तलावातील पाण्यात किंवा तेथील विजेच्या यंत्रणेत अचानक वीज (करंट) उतरली. पाण्यात उतरलेल्या या विद्युत प्रवाहामुळे रोहितला विजेचा भीषण शॉक लागला आणि तो गंभीररीत्या होरपळला. उपस्थित नागरिकांनी त्याला तात्काळ शेजारीच असलेल्या ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

मुंबईत गणेशोत्सव मंडपाजवळ विजेचा धक्का; २ जणांचा मृत्यू
तर काळाचौकीत दत्ताराम लाड मार्गावरील महागणपती उत्सव मंडळाजवळ झालेल्या दुर्घटनेत मंडपाच्या प्रवेशद्वाराजवळील तात्पुरत्या कोल्ड्रिंक स्टॉलमध्ये शॉर्ट स्क्रिप्ट झाला, विजेचा धक्का लागून २ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ८ वर्षीय रागिणी घनश्याम यादव आणि ३३ वर्षीय सुजाता यांचा समावेश आहे. अन्य ४ जण जखमी; त्यापैकी १२ वर्षीय रुही सिंहची प्रकृती गंभीर, मध्ये उपचार सुरू आहेत.  अधिकार्‍यांनी घटनास्थळी पाहणी केली; तात्पुरत्या मीटरची वायरिंग/ डिस्कनेक्ट केली आहे, पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.