मंत्री संजय शिरसाट बंगला हल्ला प्रकरणी शिरसाटांच्या बंगल्यावर हल्ला करणारे तिघे अटकेत

Foto
छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो): राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या गोलवाडी लिंकरोड परिसरातील निवासस्थानी गुरुवारी (दि. १२ ) मध्यरात्री मद्यधुंद तरुणांनी मोठा राडा घातल्याची खळबळजनक घटना घडली आहे. बंगल्याच्या दिशेने दारूच्या काचेच्या बाटल्या भिरकावून आत घुसण्याचा प्रयत्न करणार्‍या तिघा तरुणांनी सुरक्षा रक्षकांना अडवल्यावर ’मी ओएसडी आहे, चार ओएसडी खिशात घालून फिरतो,’अशी अरेरावी करत पोलिसांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणि अनधिकृत प्रवेशाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले आहे.

एफआयआरमधील धक्कादायक तपशील
पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार विजय बन्सी दारुंटे (वय ५२, बक्कल क्र. २५९६) हे गेल्या एक महिन्यापासून पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या  गोलवाडी लिंकरोड येथील निवासस्थानी गार्ड ड्युटीवर तैनात आहेत. गुरुवारी रात्री दारुंटे हे खासगी सुरक्षा रक्षक कमलेश परदेशी आणि संतोष महालकर यांच्यासोबत कर्तव्यावर होते. रात्री ११:०० वाजेच्या सुमारास ईव्ही चेतक मोपेडवरून (क्र. -२३--८५३४) तीन तरुण बंगल्यासमोर आले. त्यांनी बंगल्याच्या दिशेने दारूची बॉटल भिरकावली आणि एक बाटली फोडली. सुरक्षा रक्षकांनी त्यांना हटकले असता त्यांच्यात शाब्दिक वाद व झटापट झाली. त्यावेळी पोलिसांनी आणि रक्षकांनी या तिन्ही मद्यधुंद तरुणांना तेथून हुसकावून लावले.

मी चार  खिशात घालून फिरतो...; गेटमधून घुसून दमदाटी
हुसकावून लावल्यानंतरही या तरुणांची मुजोरी थांबली नाही. काही वेळातच ते तिघे पुन्हा आपल्या मोपेडवरून पालकमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या मुख्य गेटसमोर आले आणि गेटमधून थेट बंगल्याच्या आवारात घुसले. त्यावेळी पोलीस अंमलदार विजय दारुंटे, सुरक्षा रक्षक कमलेश परदेशी, संतोष महालकर तसेच बंगल्यावरील कर्मचारी कल्पेश कांबळे, कमलेश कांबळे आणि आसिम यांनी त्यांना रोखले. त्यावर संतापलेल्या एका तरुणाने मी ओएसडी आहे, माझी वरपर्यंत ओळख आहे, मी चार ओएसडी खिशात घालून फिरतो, अशी धमकी देत सर्वांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. या झटापटीत दोघा पोलिसांना किरकोळ दुखापतही झाली.

सातारा पोलिसांची तात्काळ कारवाई
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून गार्ड ड्युटीवरील अंमलदार विजय दारुंटे यांनी तात्काळ डायल ११२ वर कॉल केला. काही मिनिटांतच सातारा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तिन्ही तरुणांना त्यांच्या चेतक मोपेडसह ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी चौकशी केली असता आरोपींची नावे १) रोहित स्वप्निल भुताळे (वय २४, रा. एन-१ सिडको, ह.मु. उद्योगपुष्प उल्कानगरी), २) शिवम ज्ञानेश्वर गायकवाड (वय २४, शिक्षण, रा. उद्योगपुष्प उल्कानगरी) आणि ३) प्रतिक चांगदेव कुटे (वय २५, खासगी नोकरी, रा. सरस्वती कॉलनी, गेवराई, जि. बीड, ह.मु. उद्योगपुष्प उल्कानगरी) अशी निष्पन्न झाली आहेत.

दुसर्‍यांदा हल्ल्याची घटना; वरिष्ठ अधिकार्‍यांची दखल
या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. स्वतः पालकमंत्री संजय शिरसाट यांनीही वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांशी फोनवरून संपर्क साधून घटनेची माहिती घेतली. विशेष म्हणजे, पालकमंत्री शिरसाट यांच्या निवासस्थानी मध्यरात्री हल्ला व राडा होण्याची ही दुसरी वेळ आहे; यापूर्वी २१ जुलै २०२५ रोजीदेखील घुले नावाच्या तरुणाने मध्यरात्री त्यांच्या घरावर हल्ला केला होता. सातारा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दिलीप कालिदास बचटे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.