फुलंब्रीत १५ दिवसांत तीन खून

Foto
फुलंब्री, (प्रतिनिधी) : तालुक्यात पंधरा दिवसांत खुनाच्या तीन घटना घडल्याने चिंता व्यक्त होत आहे. पाथ्री व नरला परिसरातील या सलग घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

पोलिसांनी तत्परता दाखवत सर्व प्रकरणांतील आरोपींना तत्काळ अटक केली असली, तरी वाढत्या गुन्ह्यांमुळे काहीसे भीतीचे वातावरण आहे. ७ जूनला पाथ्री येथे राजू रामू बनसोड यांना डिझेल आणण्याच्या बहाण्याने जंगलात नेऊन शस्त्राने ठार मारले. याचा तपास छत्रपती संभाजीनगर येथील सिडको एन-७ पोलिसांकडे असून त्यांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे. दुसरी घटना १६ जूनला नरला शिवारात घडली. विलास काकाजी घाईट (वय ३२) यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला. 

पोलिसांच्या तपासात हा खुनाचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सर्व आरोपींना अटक केली आहे. तिसरी घटना १८ जूनच्या मध्यरात्री पाथ्री येथेच घडली. मद्यधुंद अवस्थेत घराच्या जिन्यात थांबलेल्या बाबासाहेब रावसाहेब मोरे (वय ३५) यांना बाहेर काढण्यावरून वाद झाला. यात कचरू बनसोड, वसंत बनसोड व गणेश बनसोड यांनी केलेल्या मारहाणीत मोरे यांचा मृत्यू झाला. 

पोलिसांनी या तिन्ही आरोपींनाही ताब्यात घेतले. वडोद बाजारचे सहायक पोलिस निरीक्षक विजयसिंह जोनवाल यांनी नुकताच पदभार घेतला असून गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी गावोगावी गस्त वाढवली आहे.