गंगापूर, (प्रतिनिधी) : किरकोळ वादातून पती -पत्नीने, तर दुसऱ्या एका घटनेत विवाहितेने विषारी द्रव्य प्राशन केल्याचा प्रकार गुरुवारी (ता. २८) घडला. या तिघांवरही गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती
स्थिर आहे.
वाहेगाव येथील गायरान वस्तीत राहणारे ज्ञानेश्वर रामनाथ वाघ (वय ४०) व त्यांची पत्नी देवका (वय ३५) यांच्यात गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास किरकोळ कारणावरून वाद झाला. यातून देवका यांनी विषारी द्रव्य प्राशन
केले. हे पाहून पती ज्ञानेश्वर यांनीही ते द्रव्य घेतले.
नातेवाईक व शेजाऱ्यांनी त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले. दुसऱ्या एका घटनेत, गोपाळवाडी (ता. गंगापूर) येथील अनिता नारायण पवार (वय ३०) या विवाहितेनेही विषारी द्रव्य प्राशन केले असून तिच्यावर याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दोन्ही घटनांबाबत गंगापूर पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.












