छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : रोजेबाग परिसरातील क्रेसेंट हौसिंग सोसायटीमध्ये बुधवारी (दि. १) पहाटे काही समाजकंटकांनी एका डॉक्टरसह त्यांच्या भावाच्या तीन गाड्यांना आग लावली. यात वाहनांचे मोठे नुकसान झाले. या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच कुटुंबीयांची वाहने पेटवण्याचा हा सलग दुसरा प्रकार आहे.
डॉ. अबुबकर अहेमद मोहीउद्दीन सिद्दीकी (वय ३९, रा. क्रेसेंट हौसिंग सोसायटी, रोजेबाग) हे फिर्यादी आहेत. ते व त्यांचे शिक्षक भाऊ अय्युब यांनी नेहमीप्रमाणे त्यांच्या घराशेजारील मैदानात डॉ. सिद्दीकी यांची वाहने गतवर्षी अज्ञाताने पेटविली होती. आता पुन्हा त्याच ठिकाणी त्यांची तीन वाहने पेटवण्यात आली. या कुटुंबीयांची वाहने वारंवार कोण आणि का पेटवितो, याबाबत वेगवेगळी चर्चा आहे. वैयक्तिक वादातून या घटना घडत आहेत का, याचाही पोलीस तपास करीत आहेत. धक्कादायक म्हणजे, गतवर्षीही एप्रिल महिन्यातच घटना घडली होती. तपास पोलीस उपनिरीक्षक अजित दगडखैर करीत आहेत. बुधवारी पहाटे ४ वाजून ५ मिनिटांच्या सुमारास शेजारी राहणारे सय्यद उमर फारुख यांनी त्यांना फोन करून ’गाड्यांना आग लागली आहे’, अशी माहिती दिली. यानंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेत बोअरवेलचे पाणी मारून आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत महिंद्रा केयूव्ही १०० (एमएच २० ईई ३३५९), मारुती अर्टिगा (एमएच २० सीएच ४३५०) व शाळेच्या मुलांची ने-आण करणारी टाटा मॅजिक व्हॅन (एमएच २० ईजी ३८५८) आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली होती. यात तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.















