गंगापूर, (प्रतिनिधी): छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत आंबेलोहोळ येथे आयोजित समाधान शिबिरामध्ये आमदार प्रशांत बंब यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. यावेळी गावातील शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच शिक्षकांच्या उपस्थितीबाबतही त्यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली.
शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापल्या मुख्यालयी राहून ागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी उपलब्ध राहिले पाहिजे. १५ ऑगस्टपर्यंत सर्वांनी मुख्यालयी हजर राहावे; अन्यथा सेवेतून बाहेर जाण्याची तयारी ठेवा, असा इशारा आमदार प्रशांत बंब यांनी दिला. शासकीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून जनतेला वेळेत सेवा देणे अपेक्षित आहे.
मात्र, काही अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने नागरिकांना विविध कामांसाठी हेलपाटे मारावे लागत असल्याच्या तक्रारी यावेळी नागरिकांनी मांडल्या. विशेष म्हणजे, प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी तसेच शिक्षकांनी आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी उपस्थित राहावे, यासाठी आमदार प्रशांत बंब यांच्यावर अखेरीस हात जोडून विनंती करण्याची वेळ आल्याचे चित्र या शिबिरात पाहायला मिळाले.
त्यामुळे प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मुख्यालयी उपस्थितीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तालुक्यातील आंबेलोहोळ येथील समाधान शिबिरातून नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेत त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना आमदार बंब यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. १५ ऑगस्टपर्यंत अधिकारी-कर्मचारी मुख्यालयी वास्तव्यास राहण्याच्या सूचनेची प्रशासनाकडून कितपत अंमलबजावणी होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.












