खुलताबाद - फुलंब्री रस्त्यावर कार झाडावर आदळली; तीघे जखमी
खुलताबाद, (प्रतिनिधी) : खुलताबाद - फुलंब्री रस्त्यावरील ममनापूर फाट्याजवळ सोमवारी (ता. दोन) पहाटे दोनच्या सुमारास कार झाडावर आदळून युवकाचा मृत्यू झाला. देवीच्या पाल्हाळ दर्शनावरून परतताना ही घटना घडली. सोमिनाथ लक्ष्मण पाल्हाळ (वय ३३, रा. धनगर गल्ली, आसेगाव, ता. गंगापूर) असे मृताचे नाव आहे.
या घटनेत अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. शुभम पाल्हाळ, मनोज गायकवाड (रा. हसूल) आणि विशाल भोसले (रा. जाधववाडी, छत्रपती संभाजीनगर) हे चौघे मित्र स्विफ्ट कारने (क्र. एमएच ४० एसी ४३७३) म्हैसमाळ येथील गिरिजादेवीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परतीच्या प्रवासात असताना ममनापूर फाट्यापासून काही अंतरावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्याशेजारील झाडावर जाऊन आदळली.
हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला असून झाडाची मोठी फांदी तुटून खाली पडली. मागील सीटवर बसलेल्या सोमिनाथ पाल्हाळ याला गंभीर दुखापत झाली. पहाटेची वेळ असल्याने मदतीसाठी सुरवातीला कोणीही नव्हते,
मात्र काही वेळानंतर प्रवाशांच्या ही घटना लक्षात येताच त्यांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमींना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती सोमिनाथला मृत घोषित केले. उत्वरित तिघांवर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.











