मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आज संध्याकाळी 5.30 वाजता सुनेत्रा पवारांचा शपथविधी होणार आहे. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असतील. या शपथविधीपूर्वी दुपारी 2 वाजता विधानभवनात राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत सुनेत्रा पवारांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड केली जाणार आहे. याचदरम्यान आता महत्वाची माहिती समोर आली आहे.
अजित पवारांकडे उपमुख्यमंत्रिपदासोबतच अर्थ आणि इतर महत्वाचे खातेही होते. पण उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अर्थ खाते वगळता इतर खात्याची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडेच राहणार आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क आणि क्रीडा विभागाची जबाबदारी कायम राहणार आहे. अर्थसंकल्प अधिवेशनानंतर कदाचित अर्थ खात्याची जबाबदारी पुन्हा सुनेत्रा पवार यांना मिळू शकते. आज केवळ उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार शपथ घेतील. इतर कुणाचा ही शपथविधी नसणार आहे.
शपथविधीपूर्वी विधानभवनात राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक
सदर शपथविधीपूर्वी दुपारी 2 वाजता विधानभवनात राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत सुनेत्रा पवारांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड केली जाईल. या बैठकीबाबत सुनील तटकरे यांनी विधिमंडळात पक्षाचं अधिकृत पत्रही दिलं आहे. दरम्यान आजच्या शपथविधीसाठी सुनेत्रा पवार बारामतीहून मुंबईत दाखल झाल्या आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांना राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागेल.
सुनील तटकरे हात जोडून निघून गेले
गेल्या चार महिन्यांपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू होती या प्रश्नावर उत्तर देताना सुनील तटकरे म्हणाले, मला या मुद्द्यांवर बोलायचं नाहीये. आमची विधीमंडळ पक्षाची बैठक आहे. बैठक झाल्यानंतर सगळ्या विषयांवर आम्हाला बोलता येईल, त्याचबरोबर शपथविधीबाबत शरद पवार मला काही माहिती नाही असं म्हणालेत, त्यावर तटकरे म्हणाले, एक तर पक्षाची विधीमंडळ बैठक आज दुपारी आहे. विधीमंडळात जो निर्णय होईल त्यानंतर जो निर्णय होईल तो मुख्यमंत्र्यांना अवगत केला जाईल, आज बैठकीनंतर आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ आमचं म्हणणं मुख्यमंत्र्यांसमोर ठेवू मुख्यमंत्री त्यावर निर्णय घेतील, असंही तटकरे पुढे म्हणालेत. तर सुनील तटकरे शरद पवारांना शपथविधीला बोलावणार का? या प्रश्नावर उत्तर न देता हात जोडून निघून गेल्याचं दिसून आलं.