मुंबई : एल-निनोच्या विघ्नामुळं यंदा महाराष्ट्रासह देशातील काही भागात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच मान्सूनचा परतीचा प्रवास वेगाने सुरू आहे. मात्र, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील विदर्भ, मराठवाड्यासह काही भागात पावसाचा जोर वाढला आहे. अनंत चतुर्दशीला म्हणजेच २५ सप्टेंबर रोजी राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अनंत चतुर्दशीला मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात गणपतीच्या विसर्जनाच्या मोठ्या मिरवणुका निघतात. या दिवशी काही भागात पावसामुळे खोळंबा होण्याची शक्यता आहे. मात्र, कोकण विभागात मोठ्या पावसाची शक्यता नाही. हवामान विभागाने शुक्रवारी मुंबईसह कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
मराठवाड्यात गणपती विसर्जनाच्या दिवशी पावसाचा जोर राहील. छत्रपती संभाजीनगरसह जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या सर्वच जिल्ह्यांत ताशी ४०-५० किमीच्या वेगाने वारे वाहतील. २४ ते २६ सप्टेंबरपर्यंत या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हिंगोली, नांदेड भागात विजा आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरातील हवामान स्थितीमुळे विदर्भात पावसाचा जोर जास्त असेल. गणपती विसर्जनाच्या दिवशी देखील सर्व ११ जिल्ह्यांना सोसाट्याच्या वार्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अमरावती, नागपूरसह सर्वच जिल्ह्यांत ताशी ४०-५० किमीच्या वेगाने वारे वाहतील. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट असेल.
दरम्यान, गणेशोत्सवाच्या शेवटी महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या २ दिवसांपासून राज्यातील काही भागांत जोरदार पाऊस झाला. तर पुढील २-३ दिवस विदर्भ, मराठवाड्यासह काही जिल्ह्यांत सोसाट्याच्या वार्यासह जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती खबरदारी घ्यावी लागेल.