वैजापूर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील लासुरगाव शिवारात शिवना नदीच्या पात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई केली. बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत विनाक्रमांकाचा ट्रॅक्टर आणि त्यामध्ये भरलेली एक ब्रास वाळू असा एकूण ७ लाख ६ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
शिवना नदीच्या पात्रातून वाळूची चोरी करून तिची बेकायदेशीर वाहतूक केली जात असल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी संबंधित ट्रॅक्टरवर कारवाई केली. या प्रकरणात विनाक्रमांकाचा ट्रॅक्टर वापरून वाळूची वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी ट्रॅक्टरसह वाळू जप्त केली. या प्रकरणी अंमलदार विजय जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दादासाहेब अशोक वरकड व गणेश नामदेव गोंडे रा लासुरगाव या दोन जणांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार गणेश गोरक्ष हे करीत आहेत.















