बेशिस्त पार्किंगमुळे खुलताबादेतील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर

Foto
 खुलताबाद, (प्रतिनिधी) : शहरातील मुख्य रस्त्यावर अशी वाहतूक कोंडी नेहमीच होते. ऐतिहासिक आणि धार्मिकस्थळ म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या खुलताबाद शहरात सध्या वाहतूक कोंडीने सर्वांनाच त्रस्त करून सोडले आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते नगारखाना गेट दरम्यान दोन्ही बाजूंना दुचाकी आणि चारचाकी वाहने अनधिकृपणे उभी केली जात आहेत.

खुलताबाद येथे दररोज हजारो भाविक आणि पर्यटक ऐतिहासिक वास्तू व धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी येतात. मात्र, आंबेडकर चौक ते नगारखाना गेट या मुख्य मार्गावर दोन्ही बाजूंना बेशिस्तपणे वाहने उभी केली जातात. यामुळे रस्ता अत्यंत अरुंद होऊन तासनतास वाहतूक कोंडी होते. अनेकदा पर्यटक या वाहतूक कोंडीला कंटाळून शहरात न थांबता, बाहेरूनच निघून जात आहेत. याचा थेट फटका स्थानिक व्यावसायिक आणि पर्यटनाला बसत आहे.

-- दंडात्मक कारवाई करण्याची मागणी -- 
खुलताबाद शहरात मुख्य रस्त्यावर बेशिस्त पार्किंगमुळे पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले आहे. नवनियुक्त पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालावे. मनमानीपणे वाहने उभी करणाऱ्यांवर दंडात्मक, कायदेशीर कारवाई करून हा मार्ग मोकळा श्वास घेईल, अशी व्यवस्था करावी.