गणपतीपुळे समुद्रकिनारी दुर्घटना; चार तरुणांचे मृतदेह सापडले एका तरुणाचा पोलिसांकडून शोध सुरू

Foto
छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो): रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ गणपतीपुळे येथे शनिवारी सकाळी दुर्दैवी दुर्घटना घडली. छत्रपती संभाजीनगर येथून पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांच्या गटातील पाच जण समुद्रात बुडाल्याची घटना घडली असून, त्यांचा शोध घेण्यासाठी प्रशासन आणि जीवरक्षकांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. त्यात चार  तरुणांचे मृतदेह सापडले असल्याची माहिती रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सांजवार्ताशी बोलताना दिली.
 
कोकणातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळे समुद्रकिनारी शनिवारी घडलेल्या भीषण दुर्घटनेने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. पर्यटनासाठी गेलेल्या तरुणांच्या गटातील पाच जण समुद्रात बुडाल्याची घटना घडली असून, त्यापैकी तीन तरुणांचे मृतदेह सापडले आहेत. उर्वरित दोघांचा शोध घेण्यासाठी पोलीस, जीवरक्षक आणि स्थानिक प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर येथून १९ जणांचा एक गट गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आला होता. शनिवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास गटातील काही सदस्य समुद्रकिनारी फिरत असताना पाच तरुण समुद्रात उतरले. मात्र, समुद्रातील तीव्र लाटा आणि पाण्याचा वेगवान प्रवाह यांचा अंदाज न आल्याने हे पाचही जण खोल पाण्यात ओढले गेले. घटनेची माहिती मिळताच समुद्रकिनार्‍यावर तैनात असलेले स्थानिक पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी तातडीने मदतीसाठी धावले.

 दरम्यान, प्रशासनाने तातडीने शोधमोहीम सुरू केली. पाच पैकी एकाचा मृतदेह शनिवारी तर दोघांचे मृतदेह रविवारी सकाळी मिळून आले. पोलिसांनी रीतसर पंचनामा करून तिघांचे मृतदेह आज बिडकीनकडे रवाना केले आहे. आपली मुलं पाण्यात बुडाली असल्याची माहिती मिळताच नातेवाईकांनी हा आक्रोश केला आहे. या घटनेमुळे बिडकीन सह तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बिडकीन परिसरात शोककळा पसरली आहे. मृतदेह आल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. त्यात गणपतीपुळे येथील समुद्रात छत्रपती संभाजीनगर बिडकीन येथील पाच तरुण बुडाले त्यामुळे बिडकीनवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे आज सर्व योगा दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेले कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे.

या चौघांचे मृतदेह सापडले
गणपती पुळे समुद्रात बिडकीन येथील पाच तरुण बुडाले असून त्यात चौघांचा शोध लागला असून त्यांचे मृतदेह सापडले आहे. यात प्रेम आदमाने, अनिकेत हिवराळे, यश कांबळे आणि आनंद नरवडे या चौघांचे मृतदेह सापडले आहेत. तर आणखी आदित्य राऊत या तरुणाचा शोध घेणे सुरू असल्याचे बिडकीन येथील सहायक पोलीस निरीक्षक निलेश शेळके यांनी सांगितले. दरम्यान आमचे बिडकीन आणि पैठण येथील प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरीहून रात्री बारा वाजेपर्यंत डेड बॉडी येण्याची शक्यता असल्याचे गणपती पुळे येथे असलेले बिडकीन येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष जाधव यांनी सांगितले.

मृतदेह छत्रपती संभाजीनगरकडे पाठवले: पोलीस अधीक्षक नितीन बगाटे
समुद्रातील पाण्याचा वेग आणि खोल भागातील प्रवाह लक्षात घेता शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. कालपासून समुद्रात बुडालेल्या तरुणांचा शोध घेतला जात असून ज्या तरुणांचे मृतदेह सापडले असून त्यांचे मृतदेह छत्रपती संभाजीनगरकडे पाठवून दिले आहे. इतर तरुणाचा शोध असल्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दैनिक सांजवार्ताशी बोलताना स्पष्ट केले.