सतारा : सातार्यातील कराड शहराजवळ पुणे- बेंगलोर महामार्गावर उड्डाणपूलावर मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास स्कॉर्पिओचा आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये सातार्यातील चार तरुणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. हे सर्वजण काल कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनाला गेले होते. तिथून परतत असताना रात्री ११ वाजता त्यांची कार एका ट्रकला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, गाडीतील चार तरुणांनी जागेवरच प्राण सोडले.
प्राथमिक माहितीनुसार, अपघातातील सर्व युवक कोल्हापूरच्या महालक्ष्मीला दसर्यानिमित्ताने दर्शनाला गेले होते. त्यानंतर घरी परत येत असताना हा भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या ट्रकने मागून या तरुणांच्या कारला धडक दिली. अपघातातील सर्व युवक सातार्यातील खटाव तालुक्यातील कातरखटाव गावचे आहेत. कराड शहराजवळ उभारलेल्या नवा सहापदरी उड्डाणपूल काही दिवसापूर्वीच वाहतुकीस खुला केला असून हा पहिलाच भीषण अपघात आहे. जखमींवर कराडच्या कृष्णा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
हा अपघात इतका भीषण होता की, स्कॉर्पिओ कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. या दुर्घटनेमुळे कातरखटाव गावावर शोककळा पसरला आहे. तेजस देशमुख (चालक, वय २५ वर्षे), सागर निंबाळकर (वय २३ वर्षे), सुयश चिंचकर (वय २० वर्षे) आणि रोहित धोत्रे (वय २१ वर्षे) अशी अपघातात मृत पावलेल्या चार मित्रांची नावं आहेत. तर ऋतुराज दुबळे (वय २१ वर्षे), शंतनू शिंगाडे (वय २० वर्षे) आणि अमन तांबोळी (वय २३ वर्षे) अशी जखमी मित्रांची नावे आहेत. ज्या उड्डाणपूलावर हा अपघात झाला तो काही दिवसांपूर्वीच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. या अपघातामुळे उड्डाणपुलावरील सुरक्षिततेबाबत शंका उपस्थित झाली आहे.