प्रशासनात पारदर्शकता व गतीला प्राधान्य : मनपा आयुक्त येडगे

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहरातील प्रशासनिक कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि परिणामकारक करण्याच्या उद्देशाने विविध विभागांच्या कामांचा सविस्तर आढावा महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांनी घेतला. प्रशासनात पारदर्शकता व गतीला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
लेखा विभाग, नगररचना विभाग, आरोग्य विभाग, घनकचरा व्यवस्थापन, उद्यान विभाग, कर संकलन, मालमत्ता विभाग, प्रधान मंत्री आवास योजना, अतिक्रमण विभागासह इतर सर्व विभागांचा आढावा आयुक्त  येडगे यांनी महानगरपालिका मुख्यालयात घेतला. यावेळी आयुक्त म्हणाले की, प्रलंबित फाईल्सची तत्काळ पूर्तता, कामकाजातील विलंब टाळणे आणि सर्व विभागांनी निश्चित वेळेत कार्य पूर्ण करण्यावर भर द्यावा. नागरिकांना योग्य पद्धतीने सेवा पुरविण्यात याव्यात, असा इशारा आयुक्तांनी यावेळी दिला. कर वसुलीचा आढावा घेताना ते म्हणाले की, आगामी काळात वसुलीत प्रगती साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवून नियोजन करण्यात यावे. तसेच तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा वापर वाढवून वसुली अधिक सुलभ व जलद करण्यावर भर देण्यात यावा, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
महसूल वाढीसाठी विविध पर्यायांचा आढावा घेऊन संबंधित विभागांना आवश्यक निर्देश देण्यात आले.आरोग्य विभागाच्या कामकाजाचा आढावा घेताना बायोमेडिकल वेस्ट व्यवस्थापन, कुत्रा चावणे व रेबीज नियंत्रण, रुग्णवाहिका सेवा तसेच सार्वजनिक आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. ओपीडी सेवा डिजिटल पद्धतीने अधिक कार्यक्षम करण्यावर भर देण्यात आला असून संबंधित यंत्रणेला समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले.
कामांना गती देण्याचे निर्देश 
शहरातील पायाभूत सुविधा विकासाच्या दृष्टीने रस्ते, ड्रेनेज, पार्किंग व्यवस्था तसेच शहरी नियोजनाशी संबंधित कामांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले. बेकायदेशीर कामकाजांवर नियंत्रण ठेवून पारदर्शक व शिस्तबद्ध प्रशासन राबविण्यावर भर देण्यात आला. तसेच, बीओटी तत्त्वावर प्रकल्प राबविणे, काही कामे ‘लाईव्ह मोड’मध्ये आणणे आणि विभागनिहाय प्रगतीचे नियमित मॉनिटरिंग करण्याचे निर्देश देण्यात आले. महसूल वाढ, प्रभावी अंमलबजावणी आणि सर्व विभागांमधील समन्वय यावर विशेष लक्ष केंद्रित करत शहराच्या विकासाला गती देण्याचा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला.