दहा वर्षात श्री संत एकनाथचा सर्वात कमी उतारा पारदर्शकता; तपासून ऊस घालावा : खा. भुमरे

Foto
शिवाजी शुगरचा २९०० प्रति टन भाव जाहीर

पैठण, (प्रतिनिधी): संत एकनाथ च्या स्थापनेपासून कधीही साखर उतारा नऊच्या खाली आलेला नाही परंतु गेल्या दहा वर्षापासून हा उतारा अत्यंत कमी दाखवला जात आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी भावापेक्षा पारदर्शकतेला महत्त्व द्यावे असे आवाहन खासदार संदीपान भुमरे यांनी ऊस उत्पादकांना शिवाजी शुगर मिलच्या चौथ्या गळीत हंगामाचा शुभारंभ प्रसंगी बोलताना केले आहे.

यावर्षी ऊसाला यंदा २,९०० प्लस रुपये प्रतिटन भाव देण्याची अध्यक्ष रवींद्र काळे यांची घोषणा केली. पैठण तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केवळ उसाच्या भावापेक्षा वजनातील पारदर्शकता आणि रिकव्हरीला अधिक महत्त्व द्यावे, असे आवाहन खासदार संदीपान भुमरे यांनी केले. पैठण तालुक्यातील नांदर येथील शिवाजी 

शुगर मिलच्या यंदाच्या गळीत हंगामाचा शुभारंभ खासदार संदीपान भुमरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विलास भुमरे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवाजी शुगर मिलचे अध्यक्ष वींद्र काळे यांनी यंदाच्या ऊसदराची घोषणा केली. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन यंदा शेतकऱ्यांना २,९०० रुपये प्रतिटन भाव दिला
जाईल, असे त्यांनी सांगितले. मागील वर्षी कारखान्याने २, ७०० रुपये प्रतिटन भाव दिला होता. यंदा दुष्काळामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने गतवर्षीच्या तुलनेत २०० रुपये वाढ देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतल्याचे काळे यांनी स्पष्ट केले.

गळीत हंगामाच्या शुभारंभप्रसंगी बोलताना खासदार संदीपान भुमरे म्हणाले की, यंदा निसर्गाने साथ दिलेली नाही. दुष्काळामुळे उसाच्या सरासरी उत्पादनात मोठी घट झाली आहे. ज्या ठिकाणी एकरी ४० ते ५० टन ऊस उत्पादन मिळत होते, त्या ठिकाणी यंदा उत्पादन २० टनांपर्यंत घसरण्याची शक्यता
आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदार या दोघांनाही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

शेतकऱ्यांनी अधिक भावाची अपेक्षा करणे रास्त आहे; मात्र काही कारखाने अव्वाच्या सव्वा भाव जाहीर करून शेतकऱ्यांची दिशाभूल करतात, असा आरोपही त्यांनी केला. ऊस वजन करताना काट्यात तफावत ठेवणे तसेच रिकव्हरीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे प्रकार काही ठिकाणी घडतात.

 मात्र, आपल्या कारखान्यात असे प्रकार होत नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ जाहीर केलेल्या भावाकडे न पाहता कारखान्यातील व्यवहारातील पारदर्शकतेलाही महत्त्व द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

कारखान्याचे संचालक रामचंद्र काळे, पंचायत समिती सदस्य उदयसेन काळे, भगवान देठे, भूषण कावसनकर, हरी गोसावी, पाशा धांडे, एजाज पठाण, राजू टेकाळे, गणपत म्हस्के, संतोष राऊत, आप्पासाहेब निर्मळ, जगन्नाथ दुधे, काकासाहेब टेके, राजेंद्र वाघमोडे, बाल सुब्रमण्यम कारखान्याचे कार्यकारी संचालक यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी, कामगार उपस्थित होते.