प्रवास: रेल्वेत दोन महिन्यांत 17 लाख 60 हजारांचा ऐवज चोरीला, रेल्वे विभागाने केली चाळीस चोऱ्याची नोंद

Foto
उज्ज्वला साळुंके

छत्रपती संभाजीनगर: रेल्वे प्रवास करताना अनेकजण मोबाईल चार्जिंग लावून झोपी जातात. तर अनेकजण कुठेही बॅग ठेवतात. त्यामुळे चोर त्याचा फायदा घेतात. अनेकांचा मोबाईल पळवीतात. काहीजण सोन्याचे किंमती दागिने घेऊन प्रवास करतात. त्यात अनेकांना आपले दागिने गमवावे लागतात. अशा चोरीची नोंद रेल्वे लोहमार्ग पोलीस विभागाच्या वतीने केली जाते. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात रेल्वे लोहमार्ग पोलीस विभागाने चाळीस चोरीची नोंद केली आहे. जवळपास चाळीस चोरीच्या गुन्ह्यात तब्बल 17 लाख 60 हजार 30 रुपयांचे ऐवज चोरांनी पळविला आहे.

रेल्वेने हजारो प्रवाशी प्रतिदिन प्रवास करतात. त्यामुळे नेहमीच रेल्वेला गर्दी असते. त्यातल्या त्यात सण उत्सव काळात तर गर्दीच गर्दी असते. अशीच परिस्थिती यंदाही कायम असून सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात प्रवाशांची गर्दी दिसून आली. त्यामुळे गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या बॅगा, मोबाईल, सोन्याच्या साखळी चोरांनी लंपास केली. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात अशा एकूण 40 चोरीच्या घटना घडल्या. त्याची नोंद रेल्वे लोहमार्ग पोलिस विभागाच्या वतीने केली आहे. त्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यात 16 मोबाईल, 13 बॅग, 7 सोन्याच्या साखळी चोरीला जाण्याच्या घटना घडल्या आहेत.

दोन महिन्यात झालेल्या चोऱ्या

रेल्वे लोहमार्ग पोलीस विभागाने नोंदविलेल्या चोरीच्या गुन्ह्यात सप्टेंबर महिन्यात 21 चोऱ्या झाल्या आहे. त्यात 7 बॅग, 3 सोन्याच्या साखळी तसेच 11 मोबाईलचा समावेश आहे. एकूण 15 लाख 40 हजार 470 रुपयांचा ऐवज एकाच महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये चोरीला गेला आहे. त्यापैकी केवळ 7 हजार 900 रुपयांचा ऐवज मिळाला आहे. त्यात आरोपींना देखील ताब्यात घेतले आहेत. तसेच ऑक्टोबर महिन्यात 19 चोऱ्या झाल्याची नोंद रेल्वे लोहमार्ग पोलीस विभागाने केली आहे. त्यात 21 लाख 9 हजार 560 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. त्यात बॅग सहा, मोबाईल पाच, सोन्याच्या साखळी चार, एक मोटरसायकल चोरीला गेली आहे.

प्रवाशांनी काळजी घ्यावी

प्रवाशांनी प्रवास करताना काळजी घ्यावी. सोन्याचे दागिने, किंमती वस्तू, बॅग सांभाळा, सुरक्षितरित्या प्रवास करावा. असे आवाहन रेल्वे पोलीस विभागाच्या वतीने केले जाते. मात्र तरीही अनेकजण मोबाईल चार्जिंगला लावून झोपी जातात. तसेच काहीजण मोबाईल बॅगमध्ये ठेवून बॅग कुठेही ठेवतात. त्यामुळे चोराचे फावते. सध्या मोबाईलवरच सर्वाधिक चोराची नजर असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. त्यामुळे काळजी घ्यावी. तसेच बॅग कुठेही ठेवू नये, तसेच खिडकीत बसून प्रवास करताना खिडकी बंद ठेवाव्यात. तसेच सोन्याचे दागिने घालून प्रवास करत असाल तर काळजी घ्यावी. शक्यतो सोन्याचे दागिने प्रवासात टाळावेत असे आवाहन रेल्वे पोलीस विभागाने केले आहे.