गंगापूर, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त गंगापूर आगारात मंगळवारी वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. या उपक्रमाचे उद्घाटन नगरसेवक संतोष आंबिलवादे व योगेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आगारप्रमुख विजय बोरसे, स्थानक प्रमुख सुभाष भापकर, वाहतूक निरीक्षक उज्ज्वला जारवाल, अतुल बनसोड व राहुल सुरडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात एसटी कर्मचाऱ्यांनी वृक्षसंवर्धनाची सामूहिक शपथ घेतली. लावण्यात आलेल्या प्रत्येक रोपाचे संगोपन करून परिसर अधिक हिरवागार करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. उपस्थितांनी वृक्षारोपणासोबत पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी गोपाल लकवाल, दीपक माळी, हरिचंद्र काळे, ज्ञानेश्वर सागर, वेदपाठक, कदम, संतोष इंगळे यांच्यासह आगारातील कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. लावलेल्या प्रत्येक रोपाचे संगोपन करण्याची जबाबदारी आपण सर्वांनी स्वीकारली असून, भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांमध्ये एसटी आगाराचा सक्रिय सहभाग राहील.
- विजय बोरसे, आगारप्रमुख गंगापूर
"एसटीचा वर्धापन दिन वृक्षारोपणासारख्या सामाजिक उपक्रमातून साजरा होत असल्याचा आनंद आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती होण्यास निश्चितच मदत होईल."
- संतोष आंबिलवादे, नगरसेवक न. प. गंगापूर
वृक्षारोपण हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नसून, लावलेल्या वृक्षांचे जतन व संवर्धन करणे अधिक महत्त्वाचे आहे. एसटी आगाराने वर्धापन दिनानिमित्त घेतलेला हा उपक्रम कौतुकास्पद असून, प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संवर्धनासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा."
- योगेश पाटील, समाजसेवक













