नांदेड : महाराष्ट्रात एकीकडे पावसाने धुमाकूळ घातलेला असताना दुसरीकडे मराठवाडा भूकंपाच्या धक्क्याने हादरला आहे. मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांमध्ये हे धक्के जाणवले. रात्री १.३७ वाजल्यापासून ३.२३ वाजेपर्यंत भूकंपाचे हे धक्के नागरिकांना जाणवले. या भूकंपाची तीव्रता ३.६ ते ४.६ रिश्टर स्केल नोंदवण्यात आल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
माहितीनुसार, हिंगोली, नांदेड आणि परभणी या ३ जिल्ह्यात भूकंपाचे चार सौम्य धक्के बसले. जिल्ह्याच्या आपत्कालीन केंद्रावर १.३७ वाजता, २.१५ वाजता, २.१७ आणि ३.२३ वाजता या भूकंपाच्या धक्क्यांबाबत माहिती मिळाली. या धक्क्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर अनुक्रमे ४.६, ३.६, ३.९ आणि ४.१ इतकी मोजण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात असलेल्या शिरली गावात होता. सुदैवाने यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेची हानी झाल्याचे वृत्त नाही. जेव्हा हे धक्के जाणवले, तेव्हा बहुतेक लोक घरी झोपलेले होते. अनेकजण घराबाहेर पडले.
हिंगोली, नांदेड आणि परभणी परिसरातील अनेक लोकांना हे धक्के जाणवले. पहिल्या धक्क्याचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात पांगरा शिंदे गावाच्या दक्षिणेला असलेल्या शिरली गावाजवळ होता. त्याची खोली १० किलोमीटर मोजण्यात आली. त्यानंतरच्या दोन धक्क्यांचे केंद्रबिंदू पांगरा शिंदे गावाच्या वायव्येला असलेल्या काकरढाबा गावाजवळ होते, त्याचीही खोली १० किलोमीटर होती.
एकाच रात्रीत चार भूकंपांचे धक्के बसण्याची ही पहिलीच घटना
गेल्या सहा वर्षांत हिंगोली जिल्ह्यातील औंधा नागनाथ, कलमनुरी आणि वसमत तालुक्यांमध्ये ३७ हून अधिक सौम्य भूकंपांचे धक्के नोंदवले गेले आहेत. मात्र एकाच रात्रीत चार भूकंपांचे धक्के बसण्याची ही पहिलीच घटना आहे.
धाराशिवमध्ये गूढ आवाज
गेल्या आठवड्यात धाराशिवला गूढ आवाज येण्याची मालिकाच सुरू होती. धाराशिव जिल्ह्यात दरवर्षी पावसाळ्यात सातत्याने गूढ आवाज होतात. हा आवाज व त्यामुळे बसणार्या हादर्याची तीव्रता जवळपास पूर्ण जिल्ह्यात जाणवते. अनेकदा कच्च्या भिंतीला किरकोळ तडे, तावदाने फुटणे, असे प्रकारही समोर आले आहेत. मात्र, अधिकृतपणे हे हादरे नेमके कशामुळे बसतात, याची शास्त्रीय स्पष्टता जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया या संस्थेला देता आलेली नाही. यामुळे नागरिकांत नेहमीच भीतीचे वातावरण तयार होते.