ठाणे : आदिवासी आश्रमशाळांमधील बिघडलेली शिक्षण व्यवस्था, निकृष्ट दर्जाचे जेवण आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या गंभीर प्रश्नांवरून मुंबईच्या दिशेने निघालेल्या विद्यार्थ्यांच्या उलगुलान मोर्चाला आठव्या दिवशी ठाणे हद्दीत अडवण्यात आले आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांशी धक्काबुक्की झाल्याचा आणि काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला आहे. अचानक झालेल्या या कारवाईमुळे काही विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली असून, त्यांच्यावर भिवंडीतील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आंदोलकांनी दिलेल्या माहितीनुसार, मोर्चा मुंबईच्या दिशेने जात असताना रात्री सुमारे एक वाजता पोलिसांनी विद्यार्थ्यांना मुंबईच्या दिशेने पुढे जाण्यास सांगितले होते. मात्र, विद्यार्थी पुढे निघाल्यानंतर ठाणे हद्दीत त्यांना अचानक अडवण्यात आले आणि ताब्यात घेण्यात आले. या धावपळीत आणि मध्यरात्रीच्या कारवाईदरम्यान काही विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना भिवंडी बायपास परिसरात सोडण्यात आले. त्यानंतर स्थानिक खासगी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले असून, जबाब नोंदवल्यानंतर त्यांना सोडण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
काय आहेत विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या?
आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे हाल थांबवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला असून, विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत:
- आश्रमशाळांमधील शिक्षण व्यवस्था तातडीने सुधारावी आणि दर्जेदार शिक्षण दिले जावे.
- सेंट्रल किचनची जेवणाची व्यवस्था त्वरित बंद करून आश्रमशाळांच्या आवारातच ताजे, दर्जेदार आणि पौष्टिक भोजन तयार करण्यात यावे.
- आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
- सर्पदंशामुळे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळावी,
- तसेच या दुरवस्थेला जबाबदार असलेले आदिवासी विकास विभागाचे मंत्री, आयुक्त आणि सचिवांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा.
विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप
गेल्या ८ दिवसांपासून पायपीट करत आपल्या मागण्यांसाठी मुंबईकडे निघालेल्या विद्यार्थ्यांचा मार्ग पोलिसांनी अडवल्याने, आपल्या मागण्या राज्य सरकारपर्यंत पोहोचू दिल्या जात नसल्याची तीव्र भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. या घटनेमुळे आदिवासी संघटना आणि पालकांमधून सरकार आणि पोलिसांच्या या भूमिकेबद्दल मोठा संताप व्यक्त केला जात आहे.