जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे गुरुवारी झालेल्या दहशतवाद्यांच्या आत्मघाती हल्ल्यात ‘सीआरपीएफ’ चे ४४ जवान शहीद झाले. त्यात महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यातील संजय राजपूत आणि नितीन राठोड या दोन जवानांचा समावेश असून, त्यांचे पार्थिव आज दुपारी चिकलठाणा विमानतळावर दाखल झाले. त्यांच्या पार्थिवावर केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकडीतर्फे पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. ‘भारत माता की जय’, ‘वीर जवान अमर रहे’ अशा घोषणा यावेळी उपस्थित नागरिकांनी दिल्या.
दहशतवाद्यांच्या आत्मघाती हल्ल्यात ‘सीआरपीएफ’चे जवान नितीन शिवाजी राठोड (रा. गोवर्धननगर, चोरपांगरा, जि. बुलडाणा) आणि संजयसिंह दीक्षित (राजपूत) (रा. लोणार, जि. बुलडाणा) यांना वीरमरण आले. या दोन शहीद जवानांचे पार्थिव नवी दिल्लीहून विमानाने आज शनिवारी दुपारी येथे आणण्यात आले. दुपारी बारा वाजता या दोन्ही जवानांचे पार्थिव चिकलठाणा विमानतळावर पोहोचले. त्यानंतर सैन्य दल, केंद्रीय राखीव पोलिस दल व पोलिसांतर्फे त्यांना मानवंदना देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. खा. चंद्रकांत खैरे, आ. अतुल सावे, आ. इम्तियाज जलील, आ. संजय शिरसाठ, महापौर नंदकुमार घोडले, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्यासह लष्करी अधिकारी व सीआरपीएफ’च्या जवानांनी शहीद जवान राजपूत व राठोड यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर वीर जवान राजपूत यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी लोणार येथे शासकीय वाहनातून तर राठोड यांचे पार्थिव सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे त्यांच्या मूळ गावी नेण्यात आले.